Published On : Tue, Sep 1st, 2020

प्रणव मुखर्जी सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व : नितीन गडकरी

नागपूर: देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन देशासाठी धक्कादायक आहे. एका सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्वाचे धनी ते होते. देशाचे ते ऐतिहासिक आणि असे राजकीय नेते होते की, जी भूमिका त्यांना वेळोवेळी मिळाली ती त्यांनी कर्तव्य म्हणून उत्तम प्रकारे पार पाडली, अशी प्रतिक्रिया केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

भारताच्या संसदेत अर्थमंत्री असो, वाणिज्यमंत्री असो, सांसदीय कार्य मंत्री म्हणून जी भूमिका त्यांना मिळाली त्यांनी ती यशस्वीपणेे पार पाडली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सर्वसमावेशकता होती. त्यामुळे त्यांना एक स्वीकारार्हता प्राप्त झाली होती.

आमच्यासाठी एका मार्गदर्शकाच्या भूमिकेत ते होते. व्यक्तिगत रुपाने मी भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो, तेव्हा त्यांच्याशी माझा वैयक्तिक संबंध आला. अर्थमंत्री म्हणून अनेकदा मला त्यांच्याकडे जाण्याची संधी मिळाली.

सकारात्मक दृष्टीने त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. त्यांचे माझ्याशी घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या निधनाने एक मार्गदर्शक हरपला असून भारतीय लोकशाहीत त्यांचे योगदान कधी विसरता येणार नाही, अशी भावनाही ना. गडकरी यांनी व्यक्त केली.