Published On : Tue, Apr 10th, 2018

प्रकाश भोयर, दीपक वाडीभस्मे यांची सभापतीपदी पुन्हा वर्णी

Advertisement

NMC Zones Chairman
नागपूर: नागपूर महानगरपालिका झोन सभापतीपदासाठी मंगळवारी (ता. १०) निवडणूक प्रक्रिया पार पडली. आठ झोन सभापतींची निवड अविरोध झाली तर मंगळवारी आणि आसीनगर झोनमध्ये काँग्रेस आणि बसपाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे या दोन्ही झोनसाठी निवडणूक झाली. यात आसीनगर झोनमधून बसपाच्या वंदना चांदेकर यांचा विजय झाला तर मंगळवारी झोन सभापतीपदी भाजपच्या संगीता गिऱ्हे यांनी बाजी मारली.

लक्ष्मीनगर झोनचे सभापती प्रकाश भोयर, लकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे यांना भाजपने पुन्हा संधी दिली तर अन्य सात ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. आसीनगर झोनमध्येही भाग्यश्री कानतोडे यांनाच भाजपने सभापतीपदासाठी उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. धरमपेठ झोनच्या सभापतीपदी प्रमोद कौरती, हनुमाननगर झोन सभापतीपदी रूपाली ठाकूर, धंतोली झोन सभापतीपदी विशाखा बांते, नेहरूनगर झोन सभापतीपदी रिता मुळे, गांधीबाग झोन सभापतीपदी वंदना यंगटवार, सतरंजीपुरा झोन सभापतीपदी यशश्री नंदनवार आणि मंगळवारी झोन सभापतीपदी संगीता गिऱ्हे यांची निवड झाली.

मंगळवारी आणि आसीनगर झोन वगळता सर्व झोनमध्ये केवळ भाजप उमेदवारांनीच नामांकन अर्ज दाखल केल्यामुळे तेथील निवडणूक अविरोध झाली. मंगळवारी झोनमध्ये भाजपच्या वतीने संगीता गिऱ्हे यांनी अर्ज दाखल केला. काँग्रेसतर्फे रश्मी धुर्वे तर बसपाच्या वतीने नरेंद्र वालदे यांनी अर्ज दाखल केला होता. यापैकी काँग्रेसच्या रश्मी धुर्वे यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपच्या संगीता गिऱ्हे आणि बसपाचे नरेंद्र वालदे यांच्यात निवडणूक झाली. यात संगीता गिऱ्हे यांचा ८ विरुद्ध ७ अशा मतांनी विजय झाला.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आसीनगर झोनमध्ये भाजपच्या वतीने विद्यमान सभापती भाग्यश्री कानतोडे यांनी तर बसपाच्या वतीने वंदना चांदेकर यांनी अर्ज दाखल केला. आसीनगर झोन सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे सदस्य अनुपस्थित राहिल्याने वंदना चांदेकर यांचा १०-० ने विजय झाल्याचे पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी जाहीर केले. आसीनगर आणि मंगळवारी झोनमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी बसपाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान सर्व उमेदवारांनी सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत निगम सचिव हरिश दुबे यांच्याकडे नामांकन अर्ज दाखल केले. दुपारी २.३० वाजता पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली आणि विजयी उमेदवारांची नावे घोषित केली.

Vandana Chandekar (BSP)

वंदना चांदेकर

उपमहापौर व सत्तापक्ष नेत्यांनी केला भाजपच्या सभापतींचा सत्कार
सभापतीपदी निवड झालेल्या नऊ सभापतींचा उपमहापौर दीपराज पार्डीकर व सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या हस्ते सत्तापक्ष नेते कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी माजी महापौर प्रवीण दटके, भाजपचे उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, भाजपच्या मनपातील प्रतोद दिव्या धुरडे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, परिवहन समितीचे उपसभापती प्रवीण भिसीकर, माजी स्थायी समिती सभापती संदीप जाधव, राजेश घोडपागे, ज्येष्ठ नगरसेविका चेतना टांक, प्रमिला मंथरानी, सुषमा चौधरी, उषा पायलट, सुनील हिरणवार, रूपा राय यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

बसपाच्या नवनिर्वाचित सभापती वंदना चांदेकर यांचा सत्कार
बसपाच्या आशीनगर झोनच्या नवनिर्वाचित सभापती वंदना चांदेकर यांचा मनपातील बसपाचे पक्षनेते मोहम्मद जमाल व जिल्हा बसपा अध्यक्षांच्या हस्ते बसपा पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी बसपाचे नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नरेंद्र वालदे, संजय बुर्रेवार, नगरसेविका ममता सहारे, मंगला लांजेवार, विरंका भिवगडे, माजी गटनेते मुरलीधर मेश्राम व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement