Published On : Mon, Jul 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

ओबीसींना जनगणनेतून डावलण्याचा डाव; नागपुरात काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे पाटील यांची भाजपवर टीका

Advertisement

नागपूर : ओबीसी समाजाला जनगणनेतून वगळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. नागपूर प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपच्या ओबीसी नेत्यांनी मौन सोडून भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.

गुडधे पाटील म्हणाले, संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्ष घरगणनेत एससी आणि एसटी प्रवर्गाचा समावेश करण्यात आला असताना ओबीसी प्रवर्गाला वगळण्यात आले आहे. त्यामुळे आगामी जनगणनेतही ओबीसींची नोंद होणार की नाही, याबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे. भाजपने जातनिहाय जनगणनेचा ‘मास्टरस्ट्रोक’ म्हणून प्रचार केला, पण प्रत्यक्षात ओबीसींवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपमधील २५ ओबीसी नेत्यांना पत्र पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी हे नेते केंद्र सरकारवर दबाव आणणार की गप्प बसणार, याचे उत्तर जनतेला द्यावे, असे आव्हान त्यांनी केले.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. नव्याने नियुक्त झालेल्या पोलिस आयुक्तांवर जबाबदारी ढकलणे चुकीचे असून, कायदा-सुव्यवस्थेतील बिघाडासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. “राज्यात अशा घटना वाढत असतील तर ते सरकारच्या अपयशाचे लक्षण असून, समाजातील बिघडत चाललेला समतोल रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.