Published On : Mon, Apr 19th, 2021

कोरोनाकाळात अखंडित सेवा देणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांनी स्वतःचीही काळजी घ्यावी: प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांचे आवाहन

Advertisement

विदर्भात आतापर्यंत २१ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू

नागपूर : वीज ही अत्यावश्यक सेवा असून महावितरणकडून कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत व अखंडित ठेवण्यात येत आहे. मात्र कोरोनाच्या या खडतर काळात योद्धा म्हणून कर्तव्य बजावताना महावितरणच्या नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्याला प्राधान्य द्यावे तसेच कोविड प्रतिबंधक लस ताबडतोब घ्यावी, असे आवाहन नागपूर प्रादेशिक विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी केले आहे. विदर्भात कोरोनामुळे आतापर्यंत महावितरणच्या २१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागातील १२ कर्मचारी संघटनांच्या सुमारे ४५ पदाधिकाऱ्यांशी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवारी (दि. १६ एप्रिलला) संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील आवाहन केले. मार्च २०२० ते एप्रिल २०२१ पर्यंत नागपूर प्रादेशिक विभागात १ हजार ३१७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी ६५९ कोरोनामुक्त झाले असून सद्यस्थितीत ६३७ कर्मचारी रुग्णालय व घरी उपचार घेत आहेत तर २१ सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट ही सर्व वयोगटांसाठी मोठी धोकादायक आहे.

त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी तसेच ग्राहकसेवेचे कर्तव्य बजावताना आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य द्यावे. नागपूर प्रादेशिक विभागातील नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २५ टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. येत्या १५ दिवसांत जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी कार्यालयप्रमुख व मानव संसाधन अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिले.तसेच कोरोना पासून बचाव करण्यासाठी मास्कचा नियमित वापर,हातांची नियमित स्वछता आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रींसह नियमित वाफ घेणे या चौथ्या सूत्रांचाही वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. परिमंडलस्तरावर कोरोना समन्वय कक्ष कार्यरत असून त्याद्वारे विविध अडचणींची सोडवणूक तत्परतेने करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

गेल्या मार्च महिन्यात अतिशय खडतर व आव्हानात्मक परिस्थिती असताना वीजग्राहकांच्या सहकार्याने वीजबिलांच्या माध्यमातून महसूल जमा करण्याचे कर्तव्य अभियंता, कर्मचाऱ्यांनी एकजुटीने बजावले. वरिष्ठ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरविला.याबद्दल प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्येच मान्सूनपूर्व वादळी पावसाला सुरवात होत असल्याने पुन्हा एकदा खडतर परिस्थितीत काम करण्याचे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून वेगाने करावीत असे निर्देश सुहास रंगारी यांनी या बैठकीत दिले.

या संवाद कार्यक्रमात विभागातील नागपूर प्रादेशिक विभागातील सर्व मुख्य अभियंते,अधीक्षक अभियंते यांच्यासह नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके,अधीक्षक अभियंते हरिष गजबे,अजय खोब्रागडे,अमित परांजपे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं) प्रभारी जॉन रामटेके, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांच्यासह सर्व संघटनांचे प्रादेशिक, परिमंडल व मंडलस्तरीय पदाधिकारी सहभागी झाले होते.