Published On : Sat, Jan 4th, 2020

कुंभार समाजाला उत्पादने विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ.

Advertisement

केंद्रीयमंत्री माननीय नितिनजी गडकरीयांचे हस्ते ‘ईकुंभार’ ऑनलाइन बिज़नेस पोर्टल चे लोकार्पण.

‘ईकुंभार’ ऑनलाइन बिज़नेस पोर्टल चे लोकार्पण करताना केंद्रीयमंत्री माननीय नितिनजी गडकरी, प्रकल्प संचालक व सचिव अजित पारसे, डॉ हेमंत जांभेकर, अनिल चौहान.

गेल्या काही वर्षात कुंभार समाज उपेक्षित जीवन जगत असून त्यांच्यातील कलेच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यांच्या कलेला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी ‘माती-आमची ओळख, आमचा विश्वास’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘ई-कुंभार’ ऑनलाईन बिजनेस पोर्टलद्वारे कुंभार बांधवांना व्यावसायिकदृष्ट्या नवसंजीवनी मिळणार आहे. त्यांचे उत्पादन, कलेला जागतिक स्तरावर हक्काचे व्यासपीठ मिळेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

कुंभार समाजाला आंतराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्नासाठी ‘माती-आमची ओळख, आमचा विश्वास’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत कुंभार समाजाला व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने प्रकल्प संचालक व ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनचे सचिव अजित पारसे यांनी संकेतस्थळ तयार केले. www.ekumbhar.in या संकेतस्थळाचे लोकार्पण गुरुवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले. यावेळी अजित पारसे यांच्यासह ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनचे अध्यक्ष व संशोधक डॉ. हेमंत जांभेकर, स्वयंम्‌ फाऊंडेशनचे संचालक अनिल चौहान, प्रकल्प मार्गदर्शक चारुदत्त बोकारे, प्रकल्प समन्वयक राजेश पुरोहित उपस्थित होते.

केंद्रीयमंत्री माननीय नितिनजी गडकरी यांच्या पुढाकाराने कुंभार समाजासाठी तयार करण्यात आलेले व्यासपीठ म्हणजे ‘माती-आमची ओळख, आमचा विश्वास’ हा उपक्रम असल्याचे प्रकल्प संचालक व ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनचे सचिव अजित पारसे यांनी नमुद केले. कुंभार समाज आपली उत्पादने या संकेतस्थळावर थेट अपलोड करून अपेक्षित किंमतही निश्चित करू शकतात. या ऑनलाईन विक्रीपासून ते ऑफलाईन डिलिव्हरीसाठी लागणारे सर्व प्रशिक्षण, तांत्रिक सहकार्य, संपूर्ण मार्गदर्शन निःशुल्क देण्यात येत आहे. कुंभार बांधवानी ऑनलाईन नोंदणीसाठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.

रस्त्याच्या बाजूला पोहोचलेल्या कुंभार कलेला डिजिटलपद्धतीने एक व्यवसाय म्हणून नावलौकीकास आणण्यासाठी आवश्यक सर्व व्यावसायिक पर्याय ई-कुंभार ऑनलाईनद्वारे उपलब्ध असल्याचे पारसे म्हणाले. व्यकितगत ग्राहक ते औद्योगिक प्रकल्पापर्यंत परंपरागत कुंभार उत्पादनांना योग्य दर, तांत्रिक प्रशिक्षण, सरळसोपी व्यापार यंत्रणेबाबत ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशन व स्वयंम्‌ फाउंडेशनद्वारेही उपलब्ध आहे.

बारा बलुतेदार पद्धतीतील व्यवसायापैकी कुंभार कला हा प्राचीन, परंपरागत व्यवसाय आहे. दुर्देवाने या कलेवर अवकळा आली. मात्र, या व्यावसायिक कलेला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्नातून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात ई-कुंभार ऑनलाईनची निर्मिती करण्यात आली. प्रत्येक वैयक्तिक ग्राहक ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असा या कलेचा, व्यवसायाचा प्रवास अपेक्षित असून त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण कुंभार बांधवांना देण्यात येईल. सर्व कुंभार बांधवांनी अधिक माहिती व् ऑनलाइन नोंदणीसाठी समोर यावे. 

– अजित पारसे, प्रकल्प संचालक व सचिव, ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशन.