नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयाला हजारो विद्यार्थ्यांनी घेराव घातल्याचा खोटा आणि दिशाभूल करणारा संदेश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर प्रसारित केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्यातील गुप्तवार्ता विभागात कार्यरत पोलीस हवालदार अनिल रामाजी बोद्रे यांना सोशल मीडियावरील @vizhpuneet या ‘एक्स’ खात्यावर “Thousands of students surrounded the RSS headquarters in Nagpur” असा मजकूर असलेली पोस्ट आढळली.
या पोस्टची तातडीने पडताळणी करण्यात आली. मात्र, नागपूर येथील RSS मुख्यालयाला विद्यार्थ्यांनी घेराव घातल्याची कोणतीही घटना प्रत्यक्षात घडलेली नसल्याचे निष्पन्न झाले. संबंधित पोस्ट पूर्णपणे खोटी, दिशाभूल करणारी आणि वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
RSS मुख्यालय हे शहरातील अतिसंवेदनशील ठिकाण असल्याने अशा प्रकारची खोटी माहिती सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे नागरिकांमध्ये भीती, संभ्रम आणि तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी संबंधित ‘एक्स’ खात्याच्या वापरकर्त्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 353(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कातकाडे करीत आहेत.





