नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सावनेरजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ट्रकवरील २३ वर्षीय क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. चुकीच्या दिशेने (राँग साईड) भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. सावनेर पोलिसांनी संबंधित वाहनचालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील मुलताई येथील रहिवासी रोशन पवार (वय २३) हा सीजी PX १८१६ क्रमांकाच्या ट्रकवर क्लिनर म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी रात्री सुमारे १०.१५ वाजता हा ट्रक मुलताईहून नागपूरकडे येत असताना आरजे ४२ जीबी ३३१४ क्रमांकाचे वाहन कथितरित्या चुकीच्या दिशेने भरधाव वेगात आले आणि ट्रकला समोरून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, रोशन पवार ट्रकमधून खाली फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, सावनेर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी ऋतुजा जाधव, पोलीस उपनिरीक्षक उमेश मेश्राम, महामार्ग पोलीस कर्मचारी दीपक पांचपोर व प्रदीप वाघ, तसेच हितज्योती आधार फाउंडेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
जखमी रोशन पवार याला तातडीने सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी सावनेर पोलिसांनी संबंधित वाहनचालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.





