Published On : Mon, Sep 24th, 2018

जनआरोग्य योजनेमुळे गरीबांना मिळणार आरोग्यसेवेचा आधार

Advertisement

नागपूर :केंद्र सरकारची पंतप्रधान आयुष्यमान भारत- पंतप्रधान जनआरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्यविमा योजना असून या योजनेमुळे समाजातील गरिब घटकांना आजाराप्रसंगी आरोग्यसेवेचा आधार मिळणार आहे , असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन सभागृहात पंतप्रधान जनआरोग्य योजनेचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
27 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,60,100/-
Gold 22 KT ₹ 1,48,900 /-
Silver/Kg ₹ 3,43,900 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राष्ट्रीय स्तरावर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड राज्यातील रांची येथे झाले असून या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपणही नागपुरातील कार्यक्रमात दाखवण्यात आले. देशातील सुमारे 10 कोटी कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयाचे आरोग्य विमा कवच मोफ़त उपलब्ध होणार असून सुमारे 50 कोटी लोकांना या योजनेचा फायदा मिळणार आहे .

या योजनेमध्ये सफाई कामगार, घरकाम करणारे कामगार, गठई कामगार, गवंडी, हातमाग कामगार, वेटर अशा विविध गरीब समाजघटकांचा अंतर्भाव करण्यात आला असून या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सरकारने निर्देशित केलेल्या खाजगी तसेच शासकीय रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. लहान मुलांचा कर्करोग, सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रीया तसेच मानसिक आजारांवरील उपचाराचाही या योजनेत समावेश आहे, अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली.

नागपूर जिल्ह्यात या योजनेचा लाभ सुमारे 3 लाख 77 हजार कुटुंबाना होणार असून 1 लाख 76 हजार 103 कुटुंब हे नागपूर ग्रामीण मधील आहेत. या योजनेबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य यांनी आपल्या क्षेत्रात, प्रभागात तसेच गावांमध्ये जनजागृती निर्माण करून शासकीय यंत्रणेद्वारे या योजनेचा लाभ गरिबातील गरीब व्यक्तींपर्यंत पोहचवावा, असे आवाहनही गडकरी यांनी याप्रसंगी केले.

नागपूर जिल्ह्यात नोंद झालेल्या लाभार्थ्यांपैकी निवडक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात या योजनेच्या ई-कार्डाचे वाटप नितिन गडकरी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. महाराष्ट्रात महात्मा फुले जन आरोग्य योजनेतर्फे पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनचे कार्यान्वयन होणार असून नागपूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व डागा स्मृती महाविद्यालयाचा तसेच म.न.पा. ची रुग्णालये यांचा या योजनेमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर यांनी प्रास्ताविकातून दिली.

योजनेच्या लोकार्पण सोहळ्यात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी योगेंद्र सवाई यांनी केले .

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement