Published On : Mon, Sep 24th, 2018

लोकांनी लग्नात पेट्रोल, डिझेल आहेर म्हणून द्यावेः सचिन सावंत

ठाणे: पेट्रोलचा दर नव्वदीपार व एक लिटर डिझेलची किंमत 80 रूपयांवर गेल्याने आता पेट्रोलपंपांना संरक्षण देण्याची वेळ आली असून जनतेनेही लग्नात पेट्रोल, डिझेलचा आहेर देणे सुरु करावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

राज्यात अगोदरच नव्वदी पार गेलेल्या पेट्रोलने आज मुंबई ठाणे शहर व परिसरातही नव्वदी पार केली आहे. डिझेलचे दरही प्रति लिटर 80 रूपयांच्या वर गेले आहेत व डॉलरच्या तुलनेत रूपयांची ऐतिहासीक घसरण झाली आहे. याविरोधात मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात काँग्रेस पक्षातर्फे ठाणे येथे अनोखे आंदोलन करण्यात आले. पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी पेट्रोल, डिझेल आणि डॉलरची साग्रसंगीत पूजा अर्चना करण्यात आली. ॐ पेट्रोलाय नमः।ॐ डिझेलाय नमः।ॐ डॉलराय नमः। अशा मंत्रोच्चारातून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

Advertisement

या प्रसंगी बोलताना सचिन सावंत म्हणाले की मोदींच्या नेतृत्वाखाली पेट्रोल लवकरच शंभरी पार करेल. मोदींच्या कतृत्वाने डिझेलच्या दराची वाटचालही शंभरीच्या दिशेने वेगात सुरु आहे. त्यामुळे आता पेट्रोलपंपांना संरक्षण तर द्यावे लागेलच सोबतच पेट्रोल, डिझेलची पूजाही करावी लागेल. सत्तेच्या उन्मादात मोदींना जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे.

आपल्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी सरकार चालवणा-या मोदींना सर्वसामान्य जनतेचा आक्रोश दिसत नाही. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा मार सर्वसामान्य जनतेसह शेतक-यांनाही बसत आहे. त्यामुळे या बहि-या सरकारचे कान उघडण्यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने संघर्ष करेल तसेच 2019 ला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हीच गोरगरिब जनता सर्वसामान्यांचे सरकार आणेल असा विश्वास सावंत यांनी केला.

ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे यांनीही इंधनदरवाढीवरून सरकारचा निषेध केला व ही दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. यावेळी ठाणे काँग्रेसचे पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement