Published On : Sat, Aug 17th, 2019

पूनम मॉलची भिंत कोसळून वॉचमनसह चार जखमी

नागपूर – वर्धमाननगर येथे असलेल्या पूनम मॉलची मागची भिंत आणि सज्जा कोसळून दुर्घटना झाली असून, यामध्ये एक वॉचमन आणि दोन महिला जखमी झाल्या आहेत. दरम्यान, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरामध्ये बघ्यांचीही गर्दी झाली आहे.

वर्धमाननगर येथे असलेला पूनम मॉल गेल्या दोन वर्षांपासून बंद होता. दरम्यान, आज रात्री 11.45 च्या सुमारास या मॉलचा स्लॅब आणि मागची भिंत कोसळली. त्यामुळे एक वॉचमन आणि दोन महिला ढिगाऱ्याखाली सापडून जखमी झाले.

दरम्यान, जखमी वॉचमन प्रकाश शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर मॉलच्या वर असलेल्या पाण्याच्या टाकीला गळती लागली होती. त्यामुळे सतत पाणी पाझरून मॉलच्या भिंती कमकुवत झाल्या होत्या. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.