Published On : Sat, Oct 16th, 2021

जगासमोर प्रदूषण आणि ऊर्जेचे संकट

-नवीन पर्याय शोधण्याची गरज

नागपूर– सध्या जगासमोर प्रदूषण आणि ऊर्जेचे संकट निर्माण होत आहे. आणखी किती काळ कोळशावर वीज निर्मिती करणार? पुढील पन्नास वर्षात कोळशाचा साठा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. जल, वायू परिवर्तनाचा मानवच नाही तर समस्त पृथ्वीला धोका आहे. या संकटाला ओळखून मानवाची पावले परिवर्तनाच्या दिशेने पुढे सरकली पाहिजेत. अर्थात वीज निर्मितीसाठी नवीन संशोधन व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय धम्मगुरू व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी व्यक्त केली.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बेझनबाग मैदानावर आयोजित धम्मदीक्षा सोहळ्यात सुरेई ससाई बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित होते. मंचावर भंते धम्मसारथी, भंते प्रज्ञाबोधी, धम्मबोधी, नागानंद, नागसेन, कश्यम, महानाग, नागघोष, धम्मप्रकाश, शीलपाल, संघपाल, नागपाल, किसा गौतमी, संघप्रिया थेरी, धम्मशीला, विनयशीला उपस्थित होत्या.


सुरेई ससाई पुढे म्हणाले आंबेडकरी अनुयायांना जयभीम या उच्चारातून प्रेरणा मिळते. अनुयायी जयभीमचा जयघोष करतात. मात्र, काही भंते या उच्चाराला प्राधान्य देत नाही. ते वंदामी म्हणतात, याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधले. तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब हे महासूर्य आहेत. बाबासाहेबांनी वैज्ञानिक सत्यावर आधारित बौद्ध धम्माची पुनर्रचना केली. बुद्ध आणि त्यांचा धम्म दिला. बावीस प्रतिज्ञा दिल्या. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र दिला.

आजचे भंते केवळ पोटभरू होत चालले आहेत. बुद्ध आणि बाबासाहेबांचे विचार आत्मसात करताना दिसत नाही. कुटुंबात कलह qकवा आर्थिक संकट निर्माण झाल्यास चिवर धारण करतात. अशा भंतेकडून शीलाचे पालन होताना दिसत नाही, यावर ससाई यांनी qचता व्यक्त करून संकटात सापडलेल्या जगाला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता जगात मानवी शांतता निर्माण करू शकते, असेही ससाई म्हणाले.

कार्यक्रमाला डॉ. संजय रामटेके, डॉ. एस. के. गजभिये, नगरसेवक, नगरसेविका, भिक्खू संघ, उपासक-उपासिका, युवा भीम मैत्रय संघ, इंदोरा बुद्धविहार यांच्यासह विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वांचा विचार करूनच संविधानाची निर्मिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिले. सर्व जाती-धर्माचा विचार करूनच संविधानाची निर्मिती केली. बाबासाहेबांनी पीडित, शोषितांचे नेतृत्व केले आणि सोबतच बौद्ध धम्म पुनरुज्जीवित केला, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. कोरोना काळात २२ लाख लोकांपर्यंत भोजन पोहोचविण्याचे काम मनपाच्या माध्यमातून झाले. यासाठी ३७८ संस्थांचे सहकार्य लाभले. सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी. आरोग्य चांगले ठेवा. आरोग्य चांगले राहिल्यास जीवनाचा आनंद घेता येईल. आज कोरोना हरला याचे श्रेय नागपूरकरांना जाते, असेही महापौर म्हणाले.