Published On : Sat, Oct 16th, 2021

मनपा कर्मचाऱ्यांचे सतत तीन दिवस दीक्षाभूमीवर ‘स्वच्छता कार्य’

Advertisement

– योग्य नियोजन आणि व्यवस्थापनामुळे शनिवारी सकाळपासून रस्ता वाहतुकीसाठी खुला

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांद्वारे सलग तीन दिवस अविरत स्वच्छता कार्य करण्यात आले. दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांच्या सुविधेच्या दृष्टीने मानपातर्फे व्यवस्था करण्यात आली होती. नियंत्रण कक्ष, लसीकरण केंद्र यासह पिण्याचे पाणी, शौचालय याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय दीक्षाभूमीच्या आतील आणि बाहेरील परिसरात कचरा राहू नये यासाठी कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कर्तव्य बजावले. त्याचेच परिणाम दीक्षाभूमीच्या आतील आणि बाहेरील संपूर्ण परिसर स्वच्छ करून शनिवारी १६ ऑक्टोबर रोजी येथील मुख्य मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यास अडचण निर्माण झाली नाही.

दीक्षाभूमीवर स्वच्छता आणि इतर सर्व आवश्यक सुविधेच्या दृष्टीने महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आवश्यक निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशासनाद्वारे योग्य नियोजन करून सेवाकार्य करण्यात आले. उपायुक्त राजेश भगत यांच्या मार्गदर्शनात व स्वच्छता नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या नेतृत्वात संपूर्ण परिसरातील स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी सर्व झोनच्या कर्मचाऱ्यांना सेवकार्यात सहभागी करून घेण्यात आले. प्रत्येक झोनमधील १५ स्वच्छता निरीक्षकांच्या देखरेखीत एका पाळीत १५० कर्मचारी स्वच्छतेसाठी तैनात होते. तीन पाळीमध्ये स्वच्छता कार्य करण्यात आले. एका पाळीत १५० याप्रमाणे एकूण ४५० कर्मचाऱ्यांनी दीक्षाभूमीवर स्वच्छता राखण्यासाठी कर्तव्य बजावले. याशिवाय दीक्षाभूमीकडे येणाऱ्या मार्गांची जबाबदारी संबंधित झोनकडे सोपविण्यात आली होती. झोनद्वारे मार्गांवर स्वच्छता ठेवण्यासाठी कार्य करण्यात आले.

नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे चौकामध्ये मनपाचे नियंत्रण कक्ष उभारण्यात आले होते. उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्या नेतृत्वात या नियंत्रण कक्षामध्ये बौद्ध अनुयायांना आवश्यक मदत पुरविण्यासह आरोग्य तपासणी, कोरोना चाचणी आणि लसीकरणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. नियंत्रण कक्षामध्ये तीन पाळीमध्ये झोनल अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मनपाची चमू कार्यरत होती. सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंत झोनल अधिकारी रामभाऊ तिडके, दुपारी ३ ते रात्री ११ वाजतापर्यंत झोनल अधिकारी दीनदयाल टेंभेकर आणि रात्री ११ ते सकाळी ७ वाजतापर्यंत धर्मेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात मनपाच्या चमूने सेवाकार्य बजावले. याशिवायबनियंत्रण कक्षासह रहाटे कॉलनी चौक, काछीपूरा चौक, बजाजनगर चौक, लक्ष्मीनगर चौक आणि नीरी मार्ग अशा एकूण सहा ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आले होते. झोनल आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे यांच्या नेतृत्वात आरोग्य चमूने तीन पाळीमध्ये कर्तव्य बजावून नागरिकांना सेवा दिली.

मूलभूत सुविधेच्या दृष्टीने दीक्षाभूमी परिसरात १०० पिण्याच्या पाण्याचे नळांची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय शासकीय व्यवसाय व प्रशिक्षण संस्थेजवळील परिसरात ५०० तात्पुरती शौचालय सुद्धा उभारण्यात आले होते. या शौचालयांमध्ये स्वच्छता राहावी याची विशेष खबरदारी घेण्यात आली होती. यासाठी झोनल अधिकारी रोहिदास राठोड यांच्या नेतृत्वात ७५ स्वच्छता कर्मचारी सेवारत होते. या कर्मचाऱ्यांनी सुद्धा एका पाळीत २५ याप्रमाणे तीन पाळीत कर्तव्य बजावले.

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तीनही दिवस मनपाच्या उपद्रव शोध पथकाचे जवान दीक्षाभूमी परिसरात तैनात होते. यासाठी एकूण ५८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. २८ जवानांनी प्रवेश मार्गावरील बॅरिकेडिंग आणि ३० जवान पेट्रोलिंग वर तैनात होते.

दीक्षाभूमीवर करण्यात आलेल्या कार्याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करीत कौतुक केले.

२५२ दुर्गा मूर्तींचे विसर्जन
शुक्रवारी १५ ऑक्टोबर रोजी शहरातील दुर्गादेवीच्या मूर्ती व घट विसर्जन करण्यात आले. पर्यावरणपूरक उत्सव साजरा व्हावा यादृष्टीने मनपातर्फे विसर्जनासाठी गांधीसागर, सोनेगाव आणि फुटाळा तलाव परीसरात कृत्रिम हौद तयार करण्यात आले होते. नागरिकांनी देवीच्या मूर्तींचे या हौदातच विसर्जन करण्याचे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले होते. उपायुक्त राजेश भगत यांनी महापौर आणि आयुक्तांच्या आवाहनानुसार प्रशासनाद्वारे केलेल्या तयारीचा आढावा घेऊन विसर्जन कार्य पूर्ण करण्याबाबत कर्मचाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.

शहरातील तीनही ठिकाणच्या कृत्रिम हौदांमध्ये एकूण २५२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर १०१९३ घट सुद्धा कृत्रिम हौदातच विसर्जीत करण्यात आले. विसर्जन स्थळावरून ५.२६१ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने मनपाच्या चमूला ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले. ग्रीन व्हिजिलचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर यांच्यासह अन्य स्वयंसेवकांनी नागरिकांना कृत्रिम हौदात देवीच्या मूर्तीचे विसर्जन करणे, निर्माल्य कलशामध्ये विसर्जीत करण्याबाबत आवाहन करून त्यांना सहकार्य सुद्धा केले.