-मनपात मान्यवरांचा सत्कार
-जनतेने दिलेली कामाची संधी हाच पुरस्कार
-महामेट्रोने शहर वाहतुकीचा प्रस्ताव स्वीकारावा
-पारडी ते हिंगणा टी पॉईंट उडणारी बस हवी
नागपूर: जनतेने काम करण्याची संधी नगरसेवकाच्या माध्यमातून दिली हाच एक पुरस्कार असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण ही रेल्वे गाडी आहे. प्रत्येक स्टेशनवर अनेक जण चढतात आणि उतरतात. गाडीचा डबा कितीही मोठा असला तरी आतील लोक बाहेरच्याला येऊ देत नाही. राजकारणातही तसेच आहे. जीवनभर मीच राहावे असे सर्वांना वाटते. पण अत्यंत कठीण आणि विसंगत परिस्थितीत काम करावे लागते, याकडे ना. गडकरी यांनी आज लक्ष वेधले.
महानगर पालिकेत मान्यवरांच्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने आदी उपस्थित होते. मनपातर्फे महामेट्रोचे प्रबंध निदेशक ब्रिजेश दीक्षित, सोलर इंडस्ट्रीजचे सत्यनारायण नुवाल श्रीनभ अग्रवाल, संकल्प गुप्ता, अॅड. व्ही. आर. मनोहर, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पटू मालविका बन्सोड, कु. आल्फिया पठाण आदींचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- मनपा चालविणे अत्यंत कठीण आहे. पण सर्वात कठीण नगरसेवकाचे काम. आमदार, खासदार, मंत्री भेटला नाही तरी चालेल पण सर्वसामान्य माणसाला नगरसेवक हा भेटलाच पाहिजे अशा लोकांच्या अपेक्षा आहे. चांगल्या कामाचा सन्मान झाला पाहिजे. त्यामुळेच काम करणार्याला प्रोत्साहन मिळते. महापालिकेनेही अनेक चांगली कामे केली आहेत. कोविड काळात तर महापालिकेच्या चमूने उल्लेखनीय कामगिरी करून दाखविली. हे यश मनपाच्या चमूचे यश आहे.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी सर्वांची कामे केली आहेत. विकास कामे करताना कोणताही पक्षभेद न पाळता त्यांनी कामे केली आहेत. ज्यांचा आज सत्कार करण्यात आला. त्या सर्वांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहेच, असे सांगून ना.गडकरी म्हणाले- मनपाची 1100 कोटींची मालमत्ता आता महामेट्रोकडे जाणार असे मी आजच वाचले आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यावसायिक पध्दतीने चालविण्यासाठी ब्रिजेश दीक्षित यांनी हा प्रस्ताव स्वीकारावा. तसेच पारडी ते लंडन स्ट्रीटच्या मधून हिंगणा टी पॉईंटपर्यंत सार्वजनिक वाहतूक प्रणाली म्हणून व तंत्रज्ञान विकसित करून हवेतून उडणार्या इलेक्ट्रिक बसचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा व ती सुरू करावी अशी माझी इच्छा असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.