नवी दिल्ली – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली भेट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. काही दिवसांपासून शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांदरम्यान ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. शिंदे यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत काय चर्चा झाली, याबाबत शिंदे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे.
“ही केवळ सदिच्छा भेट होती,” असं सांगत शिंदे म्हणाले, “काल एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शाह यांचं कौतुक केलं. त्यांनी गृहमंत्री म्हणून केलेल्या दीर्घकालीन प्रभावी कार्याचं कौतुक करत त्यांच्या पुढील कामगिरीबद्दलही अपेक्षा व्यक्त केल्या. याच पार्श्वभूमीवर मी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांना भेटलो.”
शिंदे यांच्या या दौऱ्यात त्यांच्या सोबत शिंदे गटाचे काही खासदारही उपस्थित होते. शिंदे म्हणाले, “सर्व खासदारांबरोबर अमित शहांशी सामूहिक बैठक झाली आणि त्यानंतर माझी त्यांच्याशी स्वतंत्र चर्चा झाली.”
या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही चर्चा झाली. “महायुतीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला. त्याच आत्मविश्वासाने आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकू,” असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
“बैठक सकारात्मक झाली असून, केंद्रीय गृहमंत्रीही महायुतीच्या भविष्यातील वाटचालीबाबत सकारात्मक आहेत,” असं सांगत शिंदे यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यावर चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.