
नागपूर : नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गादा-नेरी मार्गावरील गादा शिवारातील रुद्र डेअरी फार्मवर परिमंडळ क्रमांक ६ च्या विशेष पथकाने छापा टाकून तब्बल ११० गोवंशीय पशूंची सुटका केली. हे पशू चारा-पाण्याविना निर्दयीपणे बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, डेअरी फार्ममध्ये परवानगीशिवाय गोवंशीय पशूंना कत्तलीच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता ११० पशू बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.
पोलिसांची चाहूल लागताच डेअरी फार्मचा संचालक आणि अन्य आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी सर्व पशूंची सुरक्षित सुटका करून त्यांना पारडी येथील गोरक्षण केंद्रात हलविले.
या प्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात डेअरी फार्मच्या संचालकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाईदरम्यान सुमारे १९ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक ६ रमेश धुमाळ आणि सहायक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास तिडके व विशेष पथकाने केली. फरार आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.




