Published On : Tue, Jun 25th, 2019

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी 81 हजार रुपयाची घरफोडी

कामठी: चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलीस स्टेशन ला कार्यरत असलेल्या व कामठी शहरात वास्तव्यास असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 81 हजार रुपयांची घरफोडी झाल्याची घटना कामठी येथील आशा हॉस्पिटल च्या मागील रामकृष्ण सोसायटी येथे सकाळी 5 दरम्यान निदर्शनास आली असून घरफोडी झालेल्या या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव राहुल गुरचुंडे असे आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पोलीस कर्मचारी भिसी पोलीस स्टेशन ला पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असून कुटुंबातील पत्नी व दोन मुली ह्या कामठी येथील रामकृष्ण सोसायटी मध्ये वास्तव्यास आहेत .काल रात्री नेहमीप्रमाणे दार बंद करून झोपी गेले असता अज्ञात चोरट्याने घरमंडळी झोपेत असल्याची संधी साधून अवैधरित्या घरात प्रवेश करून कपाटात सुरक्षित ठेवलेले नगदी 12 हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असे एकूण 81 हजार रुपयाची चोरी करून पळ काढल्याची घटना काल सकाळी 5 वाजता घडली .सकाळी मॉर्निंग वॉकिंग ला जाण्याच्या बेतात मुलगी सकाळी उठली असता सदर घटना निदर्शनास आली. यासंदर्भात फिर्यादी मनीषा राहूल गुरचुंडे यांनी स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 457, 380 अनव्ये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत करीत आहेत.

– संदीप कांबळे कामठी