नागपूर : शहरात सुरू असलेल्या “ऑपरेशन थंडर” अंतर्गत नागपूर पोलिसांनी दोन मोठ्या कारवाया करून तब्बल ८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाला आहे. क्राईम ब्रांच युनिट-५ आणि सोनेगाव पोलिसांच्या पथकांनी ही कारवाई केली.
पहिली कारवाई सोनेगाव पोलिसांनी केली. गुप्त माहितीच्या आधारे वर्धा-नागपूर महामार्गावरील शिवनगाव फाट्याजवळ सापळा रचून शरद शामराव कातलाम या आरोपीला पकडण्यात आले. त्याच्याकडून ६ ग्रॅम एमडी ड्रग्ज, मोबाईल फोन आणि दुचाकी असा मिळून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसरी कारवाई क्राईम ब्रांच युनिट-५ च्या टीमने एमबी टाउन चौकात, डोमिनोज पिझ्झा दुकानासमोर केली. या ठिकाणी मुकेश उर्फ राजा ठाकरे आणि राज मानकर या दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून साडेआठ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि स्विफ्ट डिजायर कारसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणात कार्तिक कन्नाके या आरोपीने ड्रग्ज पुरवल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. नागपूर पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी मोहिमेत घेतलेल्या या सलग कारवायांमुळे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.