नागपूरचे मा. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी 29 एप्रिल 2025 रोजी रात्री 8 ते 10 दरम्यान सलग चौथ्या दिवशी अचानक शहरातील पारडी पोलीस ठाण्यास भेट दिली. नियमानुसार संध्याकाळी गस्त व सराईत गुन्हेगारांची तपासणी करणे अपेक्षित असतानाही पोलीस ठाण्याचा स्टाफ निष्क्रिय दिसून आला. यामुळे आयुक्तांनी ठाणेदारांना फटकारले आणि तत्काळ सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
आयुक्तांच्या अचानक आलेल्या भेटीमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतः ठाण्याच्या बाहेर गस्तीसाठी रवाना केले व लाठीसह पायदळ पेट्रोलिंग, गर्दीच्या ठिकाणी जाऊन गुन्हेगार तपासणी व प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश दिले. नुकत्याच उद्घाटन झालेल्या पारडी पोलीस ठाण्याची देखील त्यांनी पाहणी केली आणि साफसफाई, फर्निचर देखभाल याबाबत सूचनाही दिल्या. त्यांनी स्वतः पारडी बाजार, हनुमान मंदिर चौक, प्रजापती नगर व पुणे रोड येथे प्रत्यक्ष गस्त केली.
यानंतर पोलीस आयुक्तांनी आपल्या पथकासह सिम्बॉयसिस कॉलेज परिसराकडे थेट मार्गक्रमण केले. येथे प्रजापती मेट्रो स्टेशनजवळ टवाळखोरी करणारे काही इसम निदर्शनास आले. आयुक्तांनी स्वतः त्यांना ताब्यात घेऊन आपल्या वाहनात बसवले. याआधी त्यांनी वाठोडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार वायरलेसवर संपर्क करून त्यांना घटनास्थळी बोलावले.
या परिसरात ड्रग्स, मद्यपान, धूम्रपान व गैरवर्तनाच्या तक्रारी पोलीस आयुक्त कार्यालयात वारंवार येत असल्याने त्यांनी ही अनपेक्षित कारवाई केली. सिम्बॉयसिस परिसरात अंधारात आरडाओरड व मद्यपान करणाऱ्या काही इसमांना आयुक्तांनी स्वतः अटक केली.
या कारवाईत खालील 6 इसम सापडले आणि त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110 व 117 अंतर्गत कारवाई करण्यात आली:
पियुष देविदास क्षीरसागर (24) – प्रधानमंत्री आवास योजना, फ्लॅट नं. 306, वाठोडा
आदित्य विजय येनुरकर (21) – देवी नगर, फ्लॅट नं. 45, कोहिनूर लॉन जवळ, वाठोडा
संतोष कुमार शारदा राम – देवी नगर, कोहिनूर लॉन, प्लॉट नं. 108, वाठोडा
नमन यशवंत त्यागी (19) – सध्याचा मुक्काम: सिम्बॉयसिस होस्टेल
आर्यन रवी नेलवान (21) – सिम्बॉयसिस कॉलेज होस्टेल
अंकित राजू भोयर (25) – खापा, ता. तुमसर, जि. भंडारा
या कारवाईत पोलीस आयुक्तांनी स्वतः पुढाकार घेतल्याने नागपूर पोलीस वर्तुळात याची मोठी चर्चा झाली.
अलीकडील काळात पोलीस आयुक्त स्वतः विविध पोलीस ठाण्यांना अचानक भेट देत आहेत. त्यांनी DB पथकाच्या कारवाया, ठाणेदारांवरील शिस्तभंग कारवाई, ‘पोलीस दीदी’ मोहिम, ट्रिपल सीट कारवाई, हेल्मेटविना वाहन चालवणे, सोशल मीडियावरील समाजविघातक पोस्ट्सवर नजर अशा विविध बाबींवर कठोर पावले उचलली आहेत.
फक्त कार्यालयात बसून आदेश देण्यापेक्षा मैदानात उतरून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून कृती करणारा अधिकारी म्हणून आयुक्त सिंगल यांची प्रतिमा बळकट होत आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, ड्युटीवरील शिस्तभंग किंवा बनावट ‘सिक’ रजेवर असलेल्यांवर कारवाई होणार. मागील आठवड्यात MIDC पोलीस ठाण्याला दिलेल्या भेटीत त्यांनी तीन अधिकाऱ्यांना निलंबितही केले होते.
पोलीस यंत्रणा अधिक शिस्तबद्ध, जबाबदार आणि जनतेच्या हितासाठी कार्यरत राहावी, हा यामागील उद्देश स्पष्ट दिसतो.