Published On : Mon, Jul 22nd, 2019

वर्दीवर पोलिसांची दादागिरी

महंताला मारहाण, उजवा हात फॅक्चर, रेल्वे स्थानकावर प्रचंड गोंधळ, मारहाण करणारा पोलिस फरार

नागपुर: एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपुरात आलेल्या महंताला वर्दीधारी पोलिसाने मारहाण करून त्यांचा हात फॅक्चर केल्याची प्रचंड खळबळ जनक घटना शनिवारी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेमुळे लोहमार्ग पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू होता. प्रशांत पुंडलिक धोटे (३२, रा. पोलिस क्वॉर्टर, अजनी) असे मारहाण करणाºया पोलिस कर्मचाºयाचे नाव आहे. घटनेनंतर तो फरार झाला असून लोहमार्ग पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सोनभद्र उद्गम, सोनमुंडा, अमरकंठ मध्यप्रदेश निवासी महंत सोमेश्वर गिरी ब्रम्हलीन बारकेश्वरी गिरी (५८) हे शनिवारी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर आले. रविवारी नागपुरात मानवाधिकारी संघटेच्या संमेलनात सहभागी होण्यासाठी ते बरौनी एक्स्प्रेसने गोंदियाला आले. गोंदियाहून समता एक्स्प्रेसने रात्री ११ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. पूर्व प्रवेशव्दार अर्थात संत्रामार्केट दिशेने आॅटोरीक्षा करण्यासाठी जात असताना कर्तव्यावर असलेला पोलिस शिपाई प्रशांत याने महंत यांची तपासणी केली. बॅगमध्ये गांजा असल्याचा पोलिसाने संशय व्यक्त केला. यावरून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला जाताच पोलिसाने त्यांना मारहाण केली. पुर्व प्रवेशव्दाराजवळच त्यांचा हात मुरगाटला. त्यामुळे त्यांचा हात फॅक्चर झाला. एका महंताला मारहाण होत असल्याने प्रवासी आणि आॅटो चालकांची चांगलीच गर्दी झाली.

दरम्यान महंत जखमी झाल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. लागलीच पोलिस शिपाई अजय मसराम आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी धावले. त्यांनी लगेच जखमीला मेयो रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले. ही संधी पाहून मारहाण करणारा पोलिस घटनास्थळावरून फरार झाला. डॉक्टरांनी जखमीवर उपचार केल्यानंतर त्यांना सुटी दिली. या घटनेमुळे लोहमार्ग पोलिस ठाण्यासमोर प्रचंड गर्दी झाली होती. रात्री उशिरा पर्यंत लोकांचा जमाव होता. सज्जनाचे रक्षण आणि दुर्जनांना शिक्षा या धर्तीवर पोलिस विभाग कार्यरत आहे. कुंपनच शेत खात असेल तर त्या शेताचे रक्षण कोणी करावे, असा प्रश्न यावेळी चर्चेला गेला. घटनेची गंभीरता लक्षात घेता लोहमार्ग पोलिसांनी मारहाण करणाºया पोलिसाविरूध्द कलम ३२४, ३२५, ५०४ आणि ५०६ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गोंडाणे करीत आहेत.

कुटुंबच पोलिसात
पोलिस शिपाई प्रशांत धोटे हा ९ वर्षापूर्वी लोहमार्ग पोलिसात दाखल झाला. अजनी, मुख्यालयातून त्याची नागपूर लोहमार्ग ठाण्यात बदली झाली. मागील तीन वर्षांपासून तो नागपूर लोहमार्ग ठाण्यात नेमणुकीस आहे. त्याची पत्नी आणि वडिलही लोहमार्ग ठाण्यात (वर्धा) कार्यरत आहेत.