नागपूर : शांतिनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून तिच्याशी अश्लील वर्तन करत शारीरिक सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तक्रार मिळताच शांतिनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय पीडित महिला शांतिनगर परिसरात राहते. गुरुवारी सकाळी ती आपल्या घरात झोपली असताना आरोपी तेजराम मोंढेकर हा कथितरित्या महिलेच्या परवानगीशिवाय घरात शिरला. त्यानंतर त्याने महिलेच्या जवळ जाऊन तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे.
महिलेने त्याला विरोध केला असता आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन करून तिची लज्जा भंग करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
घटनेनंतर महिलेने शांतिनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी तेजराम मोंढेकर याला अटक केली. आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास शांतिनगर पोलिस करीत आहेत.




