Published On : Thu, Jul 16th, 2020

बारावीच्या निकालामध्ये मनपा महाविद्यालयांची सरशी

Advertisement

तिन्ही शाखांचा सरासरी निकाल ८८ टक्के : २६ टक्क्यांनी वाढ, विद्यार्थ्यांचा सत्कार

नागपूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या बारावी परिक्षेच्या निकालात नागपूर महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात २६ टक्क्यांनी वाढ झाली असून यंदाच्या तीनही शाखा मिळून निकालाची टक्केवारी ८८.०८ इतकी आहे.

जाहीर झालेल्या निकालानुसार मनपाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विज्ञान शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९४.७० इतकी आहे. कला शाखेच्या निकालाची टक्केवारी ८८.०६ तर वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी ७३.७७ इतकी आहे. तीनही शाखांमध्ये एकूण २६३ विद्यार्थी शिक्षण घेत होते, त्यापैकी २६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

विज्ञान शाखेतून एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी मनताशाह परवीन हिने ६५० पैकी ४७५ (७३.०८%) गुण प्राप्त करीत मनपा शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येण्याचा मान पटकाविला. विज्ञान शाखेतून साने गुरुजी उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाची हयात कौसर समीउज्जमा हिने ४६१ (७०.९२%) गुण मिळवून दुसरा तर साने गुरुजी उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाचीच नगमा परवीन मो. अफजल हसन हिने ४४० (६७.६९%) गुण प्राप्त करीत तिसरा क्रमांक पटकाविला.

वाणिज्य शाखेतील प्रथम तीनही विद्यार्थी एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाचे आहेत. या महाविद्यालयातील अनस बेग ५४० (८३.०८%), मो. अब्दुल रहमान मुबीन ४९६ (७६.३१%) आणि अरबीया मो. मुश्ताक ४८९ (७५.२३%) हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

कला शाखेतून एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाची अशिया फरहीन हिने ४६३ (७१.२३%) गुण प्राप्त करीत मनपा शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला. बिस्मणी महेश धुर्वे हिने ४५२ (६९.५४%) गुण प्राप्त करीत द्वितीय तर अंकित रमेश चन्ने ह्याने ४३९ (६७.५४%) गुण प्राप्त करीत तृतीय क्रमांक पटकाविला. हे दोन्ही विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होते. याच महाविद्यालयाचा रोहन हिरामण मेश्राम या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याने ३९० (६०%) गुण प्राप्त करून दिव्यांगांमध्ये प्रथम येण्याचा मान पटकाविला.

गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार
सर्व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. त्यांच्या पालकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाला उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेविका रिता मुळे, हर्षला साबळे, नगरसेवक इब्राहीम टेलर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, उपशिक्षणाधिकारी कुसूम चाफलेकर, एम.ए.के. आझाद कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक निखत रेहाना खान निजामुद्दीन, ताजाबाद कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सैय्यद हसन अली उपस्थित होते.

यावेळी गुलाबपुष्प देऊन आणि पेढा भरवून विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना उपमहापौर मनीषा कोठे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही अभिनंदन केले. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात घेतलेली भरारी हे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांच्या मेहनतीचे फळ असल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी केले. संचालन सहायक शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेंद्र सुके यांनी केले.

विद्यार्थ्यांनी मानले मनपा आणि शिक्षकांचे आभार
मनपा शाळेतील शिक्षण हे उत्तम दर्जाचे आहे, हे आम्ही विद्यार्थ्यांनी दिलेल्या निकालाने सिद्ध केल्याचे उद्‌गार गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना काढले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर खूप मेहनत घेतली. वेळप्रसंगी आम्हाला रागावलेही परंतु आमच्याकडून चांगल्या निकालासाठी जो सराव करून घेतला, तो अगदी उत्तम होता. त्यांच्या मेहनतीमुळे आणि प्रोत्साहनामुळेच आम्ही आज चांगला निकाल देऊ शकलो, अशी प्रतिक्रिया गुणवंत विद्यार्थी मोहम्मद अनस बेग आणि अर्शिया परवीन यांनी व्यक्त केली.