Published On : Thu, Aug 3rd, 2017

कविवर्य सुरेश भट सभागृहामुळे नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर : महापौर

Advertisement

नागपूर: नागपुरातील अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, पूर्णपणे सौर ऊर्जेवर संचालित कविवर्य सुरेश भट सभागृहाचे कार्य अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत उद्‌घाटन होणार असलेल्या या सभागृहाच्या अंतिम टप्प्यातील कामांची पाहणी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांसह संयुक्तपणे केली.

यावेळी माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, मनपाचे मुख्य अभियंता विजय बनगीरवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपअभियंता गभने, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर आदी उपस्थित होते.

कविवर्य सुरेश भट सभागृह हे महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रेक्षक क्षमता असलेले सभागृह आहे. दोन हजार आसनक्षमता, २०० चार चाकी वाहनांची पार्किंग, सौर ऊर्जेवर संचालित अद्ययावत प्रकाश व्यवस्था, अत्याधुनिक ध्वनिव्यवस्था हे या सभागृहाचे मुख्य आकर्षण आहे. सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात असून अखेरचा हात सभागृहावर फिरविला जात आहे.

याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, कविवर्य सुरेश भट सभागृह हे नागपूरची नवी ओळख निर्माण करणारे ठरेल. मध्य भारतातील अत्याधुनिक सांस्कृतिक सभागृह म्हणून ते नावारूपास येईल, यात शंका नाही. यामुळे नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार असल्याचेही त्या म्हणाल्या. सभागृहाचे संपूर्ण काम आटोपल्यानंतर पुढील काही दिवसातच सभागृहाचे लोकार्पण करण्यात येईल, अशी माहितीही यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दिली.

आयुक्त अश्विन मुदगल यांनी यावेळी कंत्राटदाराला काही सूचना केल्यात. अगदी बारिक-सारिक बाबींकडे कंत्राटदाराने लक्ष द्यावे. शिल्लक कार्य तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी महापौर, आयुक्त आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी सभागृहाची आसनव्यवस्था, प्रकाश व्यवस्था, दिव्यांगासाठी सभागृहात प्रवेश करण्यासाठी असलेली विशेष व्यवस्था, एक हजार, दीड हजार आणि दोन हजार आसन क्षमता कार्यक्रमानुसार करता येईल, अशी व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था, व्हीआयपी पार्किंग व्यवस्था, सभागृहाच्या प्रवेशद्वारानंतरच्या सभागृहात लावलेला २४ फूट व्यासाचा अत्याधुनिक पंखा, स्वच्छतागृहे, ॲम्पी थिएटर आदींची माहिती घेतली. आंतरसज्जेचे काम करणारे सुपर कंस्ट्रक्शनचे सुरेश पटेल व सभागृहाच्या कामावर देखरेख ठेवणारे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.