Published On : Thu, Aug 3rd, 2017

गठई कामगारांचा दुकान वाटपाचा प्रश्न १५ दिवसांत निकाली काढा

Advertisement

नागपूर : गठई कामगारांच्या उपजीविकेसाठी शासनाने १९९५ मध्ये दुकान वाटपासंदर्भात शासनादेश काढला. दुकानांसाठी अर्ज आल्यानंतरही संबंधित झोन कार्यालयाकडून आणि मनपा प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची प्रक्रिया संथ आहे. दुकान वाटपाचा प्रश्न पुढील १५ दिवसांत निकाली काढा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

नागपूर शहरात गठई कामगारांना देण्यात येणाऱ्या दुकान वाटपासंदर्भात स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी आढावा बैठकीचे आयोजन मनपा मुख्यालयातील पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला स्थायी समिती सभापती संदीप जाधव, बसपा पक्ष नेते मोहम्मद जमाल, नगरसेवक लखन येरावार, उपायुक्त रवींद्र देवतळे, सहायक आयुक्त (कर व कर आकारणी) मिलिंद मेश्राम, स्थावर अधिकारी आर. एस. भुते, चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार यांनी प्रारंभी संत रविदास आश्रय योजनेअंतर्गत गठई कामगारांना वाटप करण्यात येणाऱ्या दुकान वाटपाच्या सद्यस्थितीचा झोननिहाय आढावा घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून जे अर्ज आले आहेत, त्यावर कार्यवाही करण्यात उशीर का होत आहे, याची माहिती घेतली.

चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे यांनी झोनमधून योग्य माहिती मिळत नसल्याचे सांगितले. अर्जाच्या स्थितीसंदर्भात झोन मधून माहिती मिळण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये एक-एक समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात यावा, जेणेकरुन त्यांच्याकडून योग्य माहिती मिळेल, अशी सूचना मांडली. यावर स्थायी समिती सभापती यांनी झोनच्या सहायक आयुक्तांना तशी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. गठई कामगार हॉकर्स झोनमध्ये यायला नको. त्यांना हॉकर्सची नोंदणी बंधनकारक करण्यात येऊ नये, अशाही सूचना दिल्या. यावर आयुक्तांसोबत चर्चा करून तातडीने मार्ग काढण्यात यावा आणि गठई कामगारांचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

बैठकीला झोनचे सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, सुभाष जयदेव, राजू भिवगडे, हरिश राऊत, झोनचे उपअभियंता रवींद्र मुळे, कृष्णकुमार हेडाऊ, सहायक बाजार अधीक्षक नंदकुमार भोवते, चर्मकार सेवा संघाचे पंजाबराव सोनेकर, प्रा. डॉ. अशोक थोटे, भाऊराव तांडेकर, विजय चवरे, शाम सोनेकर, हरिचंद तांडे, रमेश सटवे, श्रावण चवडे, महादेव बोडखे व अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.