Published On : Wed, Jul 14th, 2021

बालकांसाठी न्युमोकॉकल लसीकरण सुरु – महापौरांनी केले शुभारंभ

Advertisement

नागपूर : बालकांमध्ये होणारे न्यूमोकॉकल आजार आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू रोखण्याच्या दृष्टीने नागपूर शहरात बालकांच्या न्यूमोकॉकल कांज्यूगेट (Pneumococcal conjugate) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मंगळवारी फुटाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला.

यावेळी वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती महेश महाजन, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर व डॉ. नरेन्द्र बहिरवार, डॉ.विजय जोशी, सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे, वैद्यकीय अधिकारी फुटाळा यु.पी.एच.सी डॉ. रेणूका यावलकर प्रामुख्याने उपस्थित होते.

महापौरांनी प्रसार माध्यमांशी चर्चा करतांना सांगितले की मंगळवारपासून नागपूर मनपाच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्रांमध्ये ही लस नि:शुल्क दिली जात आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये हया लसीची किमत रु ४००० आहे परंतु केन्द्र शासनाने देशातील सर्व जिल्हयांमध्ये लहान मुलांसाठी लस मोफत उपलब्ध करुन दिली आहे. बालमृत्यू दर रोखण्यास ही लस अत्यंत प्रभावी ठरत आहे. तसेच न्यूमोनियासाठी ही फायदेशीर आहे. त्यांनी बालकांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पालकांनी आपल्या बाळांना ही लस देण्याचे आवाहन केले. नागपूर शहरातील दवाखान्यातील एकूण 53 लसीकरण केंद्रावर व 987 बाह्य सत्रांमध्ये ही लस देण्यात येईल. लस पूर्णपणे सुरक्षित असून लसीचा पहिला डोस दीड महिना पहिला पेंटासोबत, दुसरा डोस साडेतीन महिने तिस-या पेंटासोबत व तिसरा बुस्टर डोस 9 महिन्यात एम. आर. सोबत देण्यात येईल.

न्युमोकॉकल लसीकरण मोहिम राज्यात सर्वच ठिकाणी राबविली जाणार आहे व यामध्ये शासनाच्या सुचनेप्रमाणे बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. पी.सी.व्ही.लसीकरण केल्यास बालकांमधील

न्युमोकॉकल आजार व त्यामुळे होणारे बालमृत्यू टाळण्यास मदत होईल.
गंभीर न्युमोकॉकल आजार : होण्याचा धोका दोन वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येतो. या लसीमुळे गंभीर न्युमोकॉकल आजारापासून बाळाचे संरक्षण तर होईलच सोबत समाजातील इतर घटकांमध्ये न्युमोकॉकल आजाराचा धोका कमी होण्यास मदत होईल.

न्युमोकॉकल न्युमोनिया काय आहे?
न्युमोकॉकल आजार म्हणजे Streptococcus Pneumoniae या बॅक्टेरीयामुळे होणारा आजार आहे. Streptococcus Pneumoniae हा बॅक्टेरीया 5 वर्षाच्या आतील मुलांमधील न्युमोनियाचे प्रमुख कारण आहे.

आजाराची लक्षणे :
ह्या आजाराची मुख्य लक्षणे खोकला, ताप येणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी आहेत. ही लक्षणे आढळून आल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी केले आहे.