Published On : Sat, Sep 7th, 2019

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौराही स्थगित

आपत्ती परिस्थितीमध्ये आपत्ती नियंत्रण कक्षाच्या टोलफ्री क्र. 1077 वर तसेच नागपूर महानगरपालिकेच्या आपातकालीन क्रमांक 7030972200 व फायर नियंत्रण कक्ष 0712-2567777 येथे संपर्क साधावा.

नागपूर : हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या (रेड ॲलर्ट) इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील सर्व शाळांना दिनांक 7 सप्टेंबर 2019 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा 7 सप्टेंबर 2019 रोजीचा नियोजित दौराही सद्यपरिस्थितीत स्थगित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी. अत्यंत आवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडावे. मात्र या परिस्थितीत घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नसून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. कोणत्याही आपत्ती परिस्थितीमध्ये मदत आवश्यक असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षाच्या टोलफ्री क्रमांक 1077 वर तसेच नागपूर महानगरपालिकेच्या आपातकालीन क्रमांक 7030972200 व फायर नियंत्रण कक्ष 0712-2567777 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच एसडीआरएफ व एनडीआरएफ कोणत्याही आपत्ती परिस्थितीशी सामोरे जाण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले असून सर्व विभाग व यंत्रणांना अतिसतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविलेले आहे.