३८ प्रभागात निघाली जनजागृती रॅली : प्लास्टिक निर्मूलनाचा केला जागर
नागपूर: ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत संपूर्ण शहरात विविध ठिकाणी प्लास्टिक निर्मूलन जनजागृती रॅली काढण्यात आली. बुधवारी (ता.१८) दुर्गा मंदिर प्रतापनगर ते माटे चौक दरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीला महापौर नंदा जिचकार यांनी हिरवी झेंडी दाखविली व या अभियानाचा शुभारंभ केला.
यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, झोनल अधिकारी आर.एम.तिडके, वर्षा चौधरी, अनुसया गुप्ता, वंदना शर्मा, रेणूका काशीकर, माधुरी इंदुरकर, श्री.गुलबसानी, श्री.सुरडकर, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लीना बुधे, कांचन सातपुते, हर्षा कापगते, ऋतुजा रहांगडाले, शुभांगी पडोळे, श्री. वेदांत, पॉला, फेली यांच्यासह मनपा लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाची चमु प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी महापौर नंदा जिचकार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे यांनी रॅलीमध्ये सहभागी होउन नागरिकांना प्लास्टिक न वापरण्याबाबत जनजागृती केली. परिसरातील घरे, दुकाने, फळविक्रेते, हॉटेल्स आदी ठिकाणी जाउन महापौर नंदा जिचकार व अन्य मान्यवरांनी प्लास्टिक गोळा केले. ‘सिंगल यूज प्लास्टिक’चा पुनर्वापर करू नये तसेच अशा प्लास्टिकचा पूर्णपणे वापर बंद करण्याचेही आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
शहरातील संपूर्ण ३८ प्रभागांमध्ये प्लास्टिक निर्मूलन जनजागृती रॅली काढण्यात आली. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत ११ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान प्लास्टिकबाबत जनजागृती करण्यात येणार असून २ ऑक्टोबरला शहरात लोकसहभागातून श्रमदान व प्लास्टिक गोळा करण्यात येणार आहे. ३ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर दरम्यान गोळा झालेल्या प्लास्टिकचा विविध पद्धतीने पुनर्वापराच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रियेसाठी ते प्लास्टिक पाठविणे व प्लास्टिकमुक्त दिवाळी साजरी करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
धरमपेठ झोन अंतर्गत रवीनगर चौकात अतिरिक्त आयुक्त राम जोशी, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, ग्रीन व्हीजीलचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्यासह ग्रीन व्हीजील फाउंडेशनचे स्वयंसेवक अभियानात सहभागी झाले.