Published On : Wed, Sep 18th, 2019

शहरातील खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबत मनपा आयुक्तांचे मेट्रो, नासुप्रसह विविध विभागांना पत्र

Advertisement

नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल : दुरुस्ती करून अहवाल देण्याचे निर्देश

नागपूर : नागपूर शहरात विविध शासकीय,निमशासकीय विभागांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची गंभीर दखल नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतली आहे. यासंदर्भात विविध वर्तमानपत्रात प्रकाशित बातम्यांमुळे उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या जनहित याचिकेचा संदर्भ देत संबंधित विभागाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी पत्राद्वारे दिले आहे.

यासंदर्भात मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी महामेट्रोचे महाव्यवस्थापक, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती, भारतीय राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांना त्यांच्या क्षेत्रांतर्गत सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची माहिती दिली आहे.

महामेट्रोच्या निर्माणकार्यादरम्यान कामठी रोड, वर्धा रोड, सेंट्रल एव्हेन्यू रोड, उत्तर अंबाझरी रोड या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यक्षेत्रांतर्गत भंडारा रोड, पारडी क्षेत्रात तसेच काटोल रोडवरील सदर क्षेत्रात यासोबतच नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यक्षेत्रातील अनेक वस्त्यांमध्ये तर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये विविध ठिकाणी खड्डे पडलेले आहेत.

या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहन चालविताना अडथळा निर्माण होत असून यामुळे एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीतीही मनपा आयुक्तांनी व्यक्त केली आहे. रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्यासंदर्भात मनपाने वेळोवेळी संबंधित विभागांना पत्रव्यवहारदेखिल केला आहे.

मात्र, त्यावर अद्यापही कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित सर्व विभागांना पुन्हा एकदा खुद्द मनपा आयुक्त यांनी पत्र पाठविले आहे. यासंदर्भात पुढील काही उपाययोजना असल्यास त्याची सुद्धा माहिती देण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी केलेले आहे.