Published On : Mon, Aug 19th, 2019

हरदास हायस्कूल कामठी येथे वृक्षारोपण

Advertisement

-माजी विद्यार्थी संघ व लॉयन्स क्लब चा संयुक्त उपक्रम

कामठी:-. दिवसेंदिवस दुष्काळाची वाढती तीव्रता, पाणी टंचाईची स्थिती तसेच पावसाचे अनियमित आगमन यामुळे पर्यावरण संतुलन बिघडू लागले आहे. शिवाय परिपूर्ण वाढलेली दोन झाडे चारजणांच्या कुटुंबासाठी पुरेसा ठरेल, एवढा ऑक्सिजन निर्माण करतात. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळेच आता वर्षभर विविध सण-समारंभ वा कार्यक्रमानिमित्त वृक्षारोपण करणे गरजेचे झाले आहे. रोपण केलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडण्यासाठी जनजागृती गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन हरदास हायस्कूल कामठीचे माजी शिक्षक व वरिष्ठ पत्रकार यशवंत वंजारी यांनी केले.

ते आज हरदास हायस्कूल कामठी माजी विद्यार्थी संघ व लॉयन्स क्लब कामठी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने कामठी येथील हरदास हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी लॉयन्स क्लब चे लॉ. ईश्वरचंद चौधरी, लॉ. अनिल चौरशिया, लॉ. सी.ए. राजेश झंवर, लॉ. अजय अग्रवाल, लॉ. सुभास मंगतानी, लॉ. अंबर दयानी, लॉ. राहुल मंगतानी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी विद्यालय परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी व लॉयन्स क्लब च्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. ही वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. कामठी शहराच्या परिसरा मधील सिमेंटचे वाढते जंगल आणि निसर्गाची झपाटय़ाने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेले असले तरी रस्त्यालगत वृक्षांचा वाणवा आहे. तर दुसरीकडे कामठी परिसरात दररोज येणाऱ्या हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडॉक्साइड वायूचाही परिणाम होत असल्याची चिंता हरदास हायस्कूल चे मुख्याध्यापक सेंगर यांनी व्यक्त केली.

तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक उपक्रम शासकीय पातळीवर राबविण्यात आले मात्र त्याचा परिणाम झाला नाही. अनेकदा वृक्षारोपण केल्यानंतर काही दिवसांतच ही वृक्ष नष्ट होत होती वा त्यांची वाढ न झाल्याने वृक्ष लागवड करूनही फायदा होत नव्हता.

यात सरकारने आता वृक्ष लागवड करून त्याची निगा राखण्याची जबाबदारीही निश्चित केली आहे. त्यामुळे वृक्षांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता लॉयन्स क्लब कामठीचे सुभाष मंगतांनी यांनी वेळी व्यक्त केली.

आभार प्रदर्शन बंडू नारनवरे यांनी केले. याप्रसंगी जयचंद पाटील, राजन शेंडे, विजय शेलारे, मनोज गणवीर, मनोज चौरशिया, राजेश नगरारे, राजेश भिवगडे, अनिल खोब्रागडे, प्रकाश वासनिक, सुधीर हाडके, मंदा डोंगरे, ज्योती मेश्राम, ज्योती बोरकर, विजया मेश्राम, विशाखा मेश्राम, संगीता मेश्राम, शोभा पानतावने आदींची उपस्थिती होती.