Published On : Tue, Mar 13th, 2018

पालघर जिल्हा मुख्यालयातील इमारतीं, प्रकल्पांच्या कामांबाबत सुनियोजन करा- मुख्यमंत्री

Advertisement

मुंबई : पालघर जिल्हा मुख्यालयातील प्रशासकीय इमारतींच्या कामांबाबत तसेच जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या कामांबाबत सुनियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

पालघर जिल्हा मुख्यालयातील विविध कामांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत विविध यंत्रणांना निर्देशित करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

पालघर जिल्हा मुख्यालयाशी निगडीत विविध इमारती तसेच त्याअंतर्गत कामांचे टप्पे करण्यात यावेत. त्यानुसार सिडकोने समन्वयाने कामे पूर्ण करावीत. नवनगर येथील विविध विभागांच्या इमारतीची स्थिती तसेच तेथील विकास कामांसह पाण्याच्या उपलब्धतेबाबत माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जिल्ह्यातील जलसंपदा विभागाशी निगडीत विविध प्रकल्पांची तसेच त्यांच्या स्थितीबाबत माहिती घेतली. तसेच प्रकल्पांच्या कामांना गती देण्याबाबतही निर्देशित केले.

जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी जिल्ह्यातील विविध कामांबाबत सादरीकरण केले. विधानभवन समिती कक्षात झालेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर आदी उपस्थित होते.