Published On : Tue, Mar 13th, 2018

रेल्वेस्थानकावर 14 मार्च पासून ओलाचे संचालन


नागपूर: भारतीय रेल्वेच्या धोरणात्मक निर्णया प्रमाणे रेल्वे स्थानकावर ओला कॅबला परवानगी मिळाली असून बुधवारपासून रेल्वे प्रशासन नागपूर रेल्वे स्थानकावर ओलाचे संचालन सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, खासगी वाहनाला परवानगी दिल्याने तेथील आॅटोचालकात प्रचंड रोष खदखदत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला आरपीएफ जवानांची मदत घ्यावी लागेल. प्रत्यक्षात ओला सुरू झाल्यावर काय होईल, याकडे लक्ष लागले आहे.

प्रवाशांच्या सोयी सुविधेत वाढ होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने खासगी वाहनासाठी रितसर निविदा काढल्या. जानेवारी महिण्यात ओला कॅबला परवानगी देण्यात आली. कंपनीने रेल्वेकडे रितसर रक्कमही भरली असून मंगळवारी रेल्वे प्रशासनाकडून नागपूर रेल्वे स्थानकाच्या ड्राप अ‍ॅण्ड गो च्या तिसºया रांगेत ओला कॅब साठी प्लॅटफार्म तयार करण्यात आले आहे. पिवळे पट्टे मारुन १० वाहनांसाठी ही जागा राखीव ठेवण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयी सुविधेत अशा प्रकारची पहिल्यांदाच व्यवस्था होत आहे.

तर दुसरीकडे खासगी वाहनामुळे आॅटोचालकांचा व्यवसाय संकटात आला असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. खासगी वाहनाला नागपूर रेल्वे स्थानकावर दिलेली परवानगी रद्य करा या प्रमुख मागणीसाठी लोकसेवा प्रिपेड आॅटो चालक – मालक टॅक्सी संघटनेचे शफीक अंसारी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंगळवारी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापकांना निवेदन दिले. तसेच रेल्वे मंत्री आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना निवेदन पाठविण्यात आले. ओला कॅबला दिलेली परवानगी रद्द करावी, अन्यथा रेल्वे स्थानकावर कुटुंबासह बेमुदत आंदोलन करण्याचा ईशाराही त्यांनी निवेदनाव्दारे रेल्वे प्रशासनाला दिला आहे. शिष्टमंडळात आॅटो -टॅक्सी संघटनेचे परवीन बनारसे, वसीम अंसारी, हुसेन खान, अल्ताफ अंसारी आणि अशफाक खान यांचा समावेश होता.