Published On : Tue, Mar 13th, 2018

सिडकोच्या नवी मुंबई, पनवेल महापालिकांतर्गंत क्षेत्रातील विविध कामांबाबत वेगाने कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : सिडकोअंतर्गत येणाऱ्या नवी मुंबई व पनवेल महापालिका क्षेत्रातील भूखंड पुनर्विकास तसेच विविध विकास कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे आढावा बैठक झाली. दोन्ही महापालिकांतर्गत येणाऱ्या सिडकोशी तसेच महसूल, नगरविकास विभागाशी निगडीत बाबींवर वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बैठकीत दिले.

बैठकीत दोन्ही महापालिका अंतर्गत येणाऱ्या सिडकोच्या विविध स्वरूपाच्या भूखंडाचे भाडेपट्टे करार नुतनीकरण, डंम्पींग ग्राऊंड भूखंडासाठीची कर भरणा यांसह विविध मुद्यांवर चर्चा झाली. भूखंडांच्या नुतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासह अन्य विकास कामांचा यावेळी आढावाही घेण्यात आला.
या सर्व कामांबाबत संबंधित यंत्रणांनी वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

विधानभवन समिती कक्षात झालेल्या बैठकीला आमदार मंदा म्हात्रे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ एन. रामास्वामी, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.