Published On : Fri, Mar 9th, 2018

मला मारण्याचा रचला गेला कट; प्रवीण तोगडिया


नागपूर : गेल्या काही काळापासून सातत्याने वादात असलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सहभागी झाले आहेत. सभास्थळी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्याचे टाळले. हे संघस्थान आहे. त्यामुळे मी येथे बोलणार नाही. परंतु माझ्या गाडीवर ट्रक चढविण्यात आला होता. मला जीवे मारण्याचा कट रचला गेला होता. परंतु मी नशीबाने वाचलो, असे डॉ.तोगडिया यांनी सांगितले.

डॉ.तोगडिया यांनी काही दिवसांअगोदर आपले ‘एन्काऊन्टर’ होणार होते, असा आरोप केला होता. त्यानंतर याच आठवड्यात त्यांच्या गाडीला सूरतजवळ अपघात झाला होता. या पार्श्वभूमीवर डॉ.तोगडिया अ.भा.प्रतिनिधी सभेत सहभागी होतात की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. परंतु डॉ.तोगडिया हे सभेत सकाळीच पोहोचले.

बाहेर निवास का ?
साधारणत: अ.भा.प्रतिनिधी सभेत समाविष्ट होणारे पदाधिकारी व स्वयंसेवक हे रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातच निवासाला असतात. डॉ.तोगडिया यांचे गुरुवारी रात्रीच नागपुरात आगमन झाले. मात्र त्यांनी रेशीमबागेत न येता बडकस चौकात एका परिचिताच्या घरी मुक्काम केला. शुक्रवारी सकाळी ते सभास्थळी दाखल झाले. तीनही दिवस त्यांचा मुक्काम बाहेरच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.