नागपूर (पिपळा) :नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पिपळा गावात शनिवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय व्यक्तिमत्त्व असलेले अतुल पाटील यांची अज्ञात कारणावरून चाकूने हत्या करण्यात आली. ही थरारक घटना रात्री दोन ते तीनच्या दरम्यान घडली.
हल्लेखोर फरार, पोलिसांचा शोध सुरू
प्राथमिक माहितीनुसार, हिमांशू कुंभलकर असे आरोपीचे नाव असून, हत्येनंतर तो घटनेच्या ठिकाणाहून फरार झाला आहे. खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा आणि साक्षी नोंदवण्याचे काम सुरू केले आहे. तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
अतुल पाटील यांचा मेयोत मृत्यू
हल्ल्यानंतर अतुल पाटील यांना गंभीर अवस्थेत मेयो रुग्णालय, नागपूर येथे हलविण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गावात शोककळा, राजकीय क्षेत्रात पोकळी
अतुल पाटील हे गावातील राजकीय आणि सामाजिक जीवनातील अत्यंत सक्रिय आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनामुळे पिपळा गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने गावाच्या राजकारणातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
खापरखेडा पोलिसांकडून या खुनाचा विविध अंगाने तपास सुरू आहे. ही हत्या वैयक्तिक वादातून झाली की इतर कोणत्यातरी कारणामुळे, याचा शोध घेतला जात आहे.