Published On : Tue, Jan 9th, 2018

साथ रोग नियंत्रणासाठी तत्पर राहा : दीपराज पार्डीकर

नागपूर: डेंग्यू, मलेरिया, हत्तीरोगाचे रुग्ण आढळल्यास तातडीने कार्यवाही सुरू करा. साथ रोग नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा आणि नेहमी तत्पर राहा, अशा सूचना कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

साथ रोग उपाययोजनासंदर्भात मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, मनपातील भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे उपस्थित होते.

यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी बैठकीत उपस्थित झोन स्वास्थ निरीक्षकांकडून झोननिहाय आढावा घेतला. कर्मचाऱ्यांची संख्या, साथरोग नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजना, फवारणी करण्यात येणाऱ्या अडचणी, मागील वर्षात साथरोगाचे किती रुग्ण आढळले, याबाबत संपूर्ण माहिती घेतली.

प्रभागात फवारणी करताना आणि इतर उपाययोजना करताना संपूर्ण माहितील संबंधित प्रभागातील नगरसेवकांना देण्याची सूचनाही कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी केली. रुग्ण आढळताच तातडीने त्याच्यावर उपचार करा आणि जेथून रुग्ण आढळला त्या परिसरात तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.