Published On : Tue, Jan 9th, 2018

पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी दिला अपघातमुक्त शहराचा संदेश

नागपूर: अपघातमुक्त नागपूर शहराचे स्वप्न साकार करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या अपघातमुक्त नागपूर समिती आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय पथनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अपघातमुक्त शहराचा संदेश दिला.

मंगळवारी (ता. ८) कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित स्पर्धेचे उद्‌घाटन कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, अपघातमुक्त नागपूर समितीचे कार्याध्यक्ष राजू वाघ, महासचिव अजय डबीर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर म्हणाले, अपघातमुक्त नागपूर करणे आमचे उद्दिष्ट आहे. नियमाचे पालन करणे हे आपले कर्तव्यच आहे. समाजघटकातील सर्वांना वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. अपघाताला कारणीभूत असलेला किंवा अपघातात बळी पडलेला हा आपल्याच परिसरातील असतो. वाहतुकीचे नियम सर्वांनी काटेकोरपणे पाळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे बोलताना म्हणाले, देशात दरवर्षी पाच लाख अपघात होतात. दीड लाख नागरिक दरवर्षी बळी पडतात. यामुळे परिवाराचे नुकसान होते. शाळा, महाविद्यालयांमार्फत याची जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती दिलीप दिवे यांनी दिली.

स्पर्धेदरम्यान पथनाट्याद्वारे विविध शाळांनी अपघातमुक्त शहराचा संदेश दिला. मनपा व खाजगी अशा १४ शाळांनी या पथनाट्य स्पर्धेत सहभाग घेतला. या पथनाट्याचे परिक्षक म्हणून मंगेश बावसे, गौरव चाटी, सारंग मास्टे यांनी काम पाहिले.

मनपा व अपघातमुक्त नागपूर समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी पथनाट्यातून, वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करणे, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी शहर अपघातमुक्त ॲप तयार करणे असा समितीचा मानस आहे. अशा उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे एक लाख नागरिकांपर्यंत अपघातमुक्त नागपूरसंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. त्यापैकी २५ हजार नागरिकांना यशवंत स्टेडियम येथे अपघातमुक्त शहराची शपथ देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित राहतील, अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष राजू वाघ यांनी प्रास्ताविकातून दिली.

कार्यक्रमाला क्रीडा विभागाचे निरीक्षक नरेश चौधरी, समन्वयक मोहन करणकर, सागर घोडमारे, मुख्याधापक संजय पुंड उपस्थित होते.