Published On : Tue, Jan 9th, 2018

‘शिक्षण सप्ताहा’चे थाटात उद्‌घाटन

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारा संचालित शाळांच्या आंतरशालेय स्पर्धांना ‘शिक्षण सप्ताहां’तर्गत मंगळवारी (ता. ९) सुरुवात झाली. झोनस्तरावर सुरू झालेल्या स्पर्धेचे उद्‌घाटन कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते झाले.

मंगळवारी झोनअंतर्गत येणाऱ्या आर.बी.जी.जी. हिंदी माध्यमिक शाळेच्या पटांगणावर आयोजित उद्‌घाटन समारंभाला कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, सदस्य राजेंद्र सोनकुसरे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, आर.बी.जी.जी. हिंदी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कांता वावटे, शाळा निरीक्षक माया इवनाते उपस्थित होते.

कबड्डी मैदानाचे पूजन करून कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी शिक्षण सप्ताहाचे उद्‌घाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, शिक्षणासोबतच खेळ हे शारीरिक वाढीसाठी आवश्यक असतात. मनपा शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये खेळभावना वृद्धींगत व्हावी, या उद्देशाने मनपाच्या शिक्षण विभागाने यंदा प्रथमच अशा सप्ताहाचे आयोजन केले आहे. अशा स्पर्धांमधून उत्तम खेळाडू समोर येतील, असा विश्वास श्री. पार्डीकर यांनी व्यक्त केला.

शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी शिक्षण सप्ताहांतर्गत सुरू झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सर्व खेळ खिलाडूवृत्तीने खेळा, असे आवाहनही त्यांनी केले.

उद्‌घाटन समारंभानंतर आर.बी.जी.जी. हिंदी माध्यमिक शाळा आणि मकरधोकडा उच्च प्राथमिक शाळा यांच्यामध्ये कबड्डीचा सामना रंगला. या सामन्यात मकरधोकडा उच्च प्राथमिक शाळेने आर.बी.जी.जी.वर मात करीत सामन्यात २२-११ गुणांनी विजय संपादन केला.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. बाळासाहेब बन्सोड यांनी केले. शिक्षण सप्ताहांर्गत सुरू झालेल्या स्पर्धांचे झोननिहाय उद्‌घाटन संबंधित प्रभागातील नगरसेवकांच्या हस्ते झाले. ९ ते ११ जानेवारी दरम्यान झोन स्तरावर आणि १२ व १३ जानेवारी रोजी यशवंत स्टेडियम येथे झोनअंतर्गत स्पर्धांनी शिक्षण सप्ताहाचा समारोप होईल. क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, लंगडी, रस्साखेच, फुटबॉल, धावणे, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, तिहेरी उडी आदी स्पर्धांचा समावेश असल्याची माहिती क्रीडा विभाग प्रमुख नरेश सवाईतूल यांनी दिली.