नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गेल्या पाच वर्षात ८ हजार ८८२ मुली-महिला बेपत्ता झाल्या असून त्यापैकी नागपूर पोलिसांनी ८ हजार ५०१ मुलींची शोध घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बेपत्ता मुलींचा शोध घेण्यास नागपूर पोलीस राज्यात अव्वल ठरले.
गेल्या पाच वर्षांत २०१९ ते २०२३ (मे) पर्यंत ७४१३ महिला व १४६९ अल्पवयीन मुली नागपुरातून बेपत्ता झाल्याची नोंद नागपूर पोलिसांनी केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मानवी तस्करी विरोधी पथकाची (एएचटीयू) स्थापना करून बेपत्ता मुलींचा शोध घेण्यात मोठे यश मिळविले आहे.
नागपूर पोलिसांनी पाच वर्षांत ८ हजार ५०१ मुलींचा शोध घेऊन त्यांना आपल्या कुटुंबियांना सोपविले आहे. सध्या शहरातील ३८१ मुली बेपत्ता असून सर्व स्तरावर त्यांच्या शोध घेणे सुरु आहे. यादरम्यान अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळयात ओढून त्यांना पळवून नेणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. यात कौटुंबिक वादातून पळ काढलेल्या मुलींचाही समावेश आहे. ज्यात अनेक मुली देहव्यापार, शरीरविक्री, अंमली पदार्थाचे सेवन किंवा गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये ढकलल्या जातात.
शहरातून अल्पवयीन मुली किंवा तरुणी बेपत्ता होणे हा मोठा गंभीर प्रश्न असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष एएचटीयू पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.