नागपूर : वर्धमान नगर रस्त्यावर पोलीस गणवेशात एक व्यक्ती स्टंट करत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. हेल्मेट घातलेलं असलं तरी स्कूटीवर मागे वळून, हात जोडत, धोकादायकपणे वाहन चालवणं हे सगळं थेट वाहतूक नियमांचं उल्लंघन होतं.
या स्टंटने प्रेरित होऊन आणखी एक सामान्य नागरिक LIC चौक ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर फ्लायओव्हर या मार्गावर तशाच थाटात स्टंट करताना दिसला. दोन्ही व्हिडिओंमध्ये वाहतूक नियमांचा बिनधास्त भंग झाल्याचं स्पष्ट दिसतं.
मात्र या प्रकारांवर नागपूर पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने नागरीकांत तीव्र नाराजी होती. “सामान्य नागरिक चूक करतो तेव्हा लगेच दंड आकारला जातो, पण गणवेशात असलेल्यांना मोकळं रान का?” असा सवाल नागरिक विचारू लागले.
या पार्श्वभूमीवर, व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती पोलीस नसून होमगार्ड असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी चालन कापत दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या एसीपी माधुरी बाविस्कर यांनी ‘नागपूर टुडे’शी बोलताना दिली.
तसेच या प्रकाराबाबत जिल्हा होमगार्ड कार्यालयातही तक्रार पाठवण्यात आली असून, संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस बजावण्यात आली आहे.रस्त्यावरील शिस्त ही सर्वांसाठी सारखीच असावी, नियमांचं उल्लंघन कोणताही वर्दीवाला करत असेल तरी त्याच्यावर तत्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.