Published On : Thu, Jun 4th, 2020

कोव्हिड – १९ चा मुकाबला करतांना प्रशासन व लोकप्रतिनिधी मध्ये समन्वय ठेवा : महापौर संदीप जोशी

Advertisement

गट नेते व पदाधिका-यांसमवेत आयुक्तांची बैठक

नागपूर: कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती वेळोवेळी नगरसेवकांना भेटत नाही. मनपा प्रशासनाच्या पदाधिका-यांच्या सोबत समन्वयचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांना सामोरे जाताना नगरसेवकांसमोर अडचणी येत आहे. तरी यापुढे कोव्हिड-१९ च्या मुकाबला करतांना प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय ठेवण्यात यावा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

कोव्हिड-१९ संदर्भातील नागपूर शहरातील सद्यस्थितीवर मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला महापौर संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक तथा आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त तुकाराम मुंढे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, प्रतोद दिव्या धुरडे, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, शिवसेनेचे गटनेते किशोर कुमेरिया, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, बसपाच्या गटनेत्या वैशाली नारनवरे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती अभय गोटेकर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, उपायुक्त अमोल चौरपगार, मुख्य वित्त व लेखा अधिकारी हेमंत ठाकरे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, शिवसेना गट नेते किशोर कुमेरिया, राकाँचे गटनेता दुनेश्वर पेठे यांनी सांगीतले की प्रशासन नगरसेवकांसोबत समन्वयाने वागत नाही. प्रशासन जे काही निर्णय घेत होते, त्याबद्दल नगरसेवकांना माहिती नसल्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण होतो. नगरसेवकही आपल्या परीने नागरिकांसाठी सेवाकार्य करीत होते. मनपाने नगरसेवकांना सोबत घेतले असते तर नागपूर महानगरपालिकेतर्फे कोव्हिड काळात करण्यात आलेले कार्य अधिक प्रभावीपणे झाले असते, अशी भावना व्यक्त केली.

ज्येष्ठ नगरसेवक तथा आमदार प्रवीण दटके यांनी प्रशासनाच्या निर्णयांवर रोष व्यक्त केला. विलगीकरण केंद्रात देण्यात येणाऱ्या भोजनाविषयी अनेक तक्रारी होती. लोकांना जर विलगीकरण केंद्रात चांगल्या सोयी दिल्या तर लोकं स्वत:हून विलगीकरण केंद्रात येण्यास तयार झाले असते, असे ते म्हणाले.

यावर उत्तर देताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, की जे काही निर्णय झाले ते जनतेच्या हितासाठी आणि शासनाच्या वेळोवेळी आलेल्या दिशानिर्देशानुसारच घेण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्राचे निर्णय हे शासनाच्या दिशानिर्देशानुसारच घेण्यात आले आहेत. यामध्ये ज्यांनी अडथळा आणला त्यांना वेळोवेळी समजाविण्याचा प्रयत्न केला. नागरिकांना हॉटस्पॉट मधून विलगीकरण केल्यामुळे कोरोनाची साखळी खंडित करता आली. त्यांनी विलगीकरण करण्याची पध्दती विस्ताराने सांगितली. सध्या नागपूरचा रिकव्हरी रेट चांगला आहे. विलगीकरण केंद्रात भोजन पुरविण्यासाठी राधास्वामी सत्संग ब्यासच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली. हे भोजन चांगल्या प्रतीचे असून याबाबत नागरिकांची कुठलीही तक्रार नाही. शासनाकडून जो निधी यासाठी आला त्याचा वापर दिशानिर्देशानुसारच करण्यात आला. इतर जो निधी खर्च करणे आवश्यक होते तो मनपाच्या लेखाशीर्षातून आवश्यकतेनुसार खर्च करण्यात आला. यापुढे प्रत्येक निर्णयांची माहिती देण्यात येईल, असे आश्वासन ही त्यांनी दिले. त्यांनी सांगितले की कोविड-१९ ला हददपार करण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, आशा वर्कर, सफाई कामगार व इतर सर्वांचे मोलाचे योगदान आहे.

महापौर संदीप जोशी यांनी सांगितले की नगरसेवक हे जनतेचे प्रतिनिधी असून त्यांना सोबत घ्यायला पाहीजे. त्यामुळे प्रशासन जे काही करते, त्याची माहिती नगरसेवकांना व्हायलाच हवी. गेल्या दोन महिन्याच्या काळात महापौरांसह कुणालाही मनपा प्रशासनानी माहिती दिली नाही. त्यामुळे यापुढे प्रत्येक नगरसेवकांना विश्वासात घेऊन कामे करावी. पदाधिकारी आणि प्रशासन मिळून कोरोना ला हददपार करु, असेही ते म्हणाले.

पावसाळा तोंडावर आहे, त्यामुळे पावसाळी नाल्या, गटरलाईन व अन्य महत्त्वाची पावसाळापूर्व कामे करण्यासाठी नगरसेवकांचा निधी वापरण्यास अनुमती देण्याचे निर्देशही महापौर संदीप जोशी यांनी दिले. आतापर्यंत प्रशासनाने घेतलेल्या सर्व निर्णयांची प्रत महापौर कार्यालयाला पाठवावी. गांधीनगर रुग्णालयाची माहिती तीन दिवसांत सादर करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले