Published On : Sat, Jul 15th, 2017

थकीत कर भरा आणि जप्तीची कारवाई टाळा : महापौर नंदा जिचकार

Nanda Jichkar
नागपूर:
मालमत्ता कर आणि पाणी कर थकीत असलेले नागरिक आणि काही संस्थांच्या मागणीवरुन थकबाकीदारांना आपली पाटी कोरी करता यावी यासाठी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांनी अंतिम मालमत्ता व पाणी कर अभय योजना 2017 सादर केली असून या योजनेला मंजुरी मिळाली आहे. याअंतर्गत येत्या 17 जुलै ते 7 ऑगस्ट 2017 दरम्यान नागरिकांना आपले थकीत मालमत्ता कर आणि पाणी कर भरुन या योजनेचा लाभ घेता येईल.

मालमत्ता कर अभय योजनेअंतर्गत मालमत्ता धारकांना आपल्या थकीत करातील दंडाची रक्कम 90% माफ केली जाईल. तसेच थकित पाणी बिलावरील विलंब शुल्क किंवा दंडाच्या रक्कम 100 % माफ करण्यात येणार आहे. नागरिकांनी भविष्यात आपल्या मालमत्तेवरील जप्ती टाळण्यासाठी व नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई टाळण्यासाठी आपले थकीत कर भरावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी शनिवारी (ता. 15 जुलै) आयोजित पत्रकार परिषदेत केले.

यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले, नगरसेवक महेंद्र धनविजय, दिव्या धुरडे उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, शहराच्या विकासात योगदान देणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. नागरिकांच्या व काही स्वयंसेवी संस्थांच्या मागणीवरुन आपली पाटी कोरी करण्यासाठी ही शेवटची योजना सादर करण्यात आली आहे. या योजनेच्या कालावधीत टप्प्या-टप्प्यातदेखिल किंवा दररोजदेखिल थकबाकी रक्कम भरता येईल. मात्र योजना संपुष्टात आल्यानंतर मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्तेवर थेट जप्तीची कारवाई करण्यात येईल व मालमत्तेचा लिलाव करुन थकबाकी वसूल करण्यात येईल. पाणी कर थकीत असलेल्यांची नळ जोडणी खंडीत कऱण्यात येणार आहे.

सर्वाधिक वसूली करणाऱ्या झोनला 51 हजार रुपये
या योजनेअंतर्गत वसुलीचे उद्दिष्ट गाठणाऱ्या झोनला (मालमत्ता व पाणी कर प्रत्येकासाठी वेगळे पुरस्कार) 51 हजार रुपये पुरस्कार देण्यात येईल. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता (इंसेंटिव्ह) देण्यात येईल. तसेच कामचुकार अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

8 ऑगस्टला “टॉप 10” मालमत्ता जप्त करणार
17 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान या योजनेचा लाभ न घेता, थकबाकीदारांनी कर न भरल्यास शहरातील“टॉप 10” थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात येतील. यांचा लिलाव करुन थकबाकी वसूल करण्यात येणार आहे. योजनेच्या कालावधीनंतर पाणी बिल थकीत असणा-यांची नळ जोडणी खंडीत करण्यात येईल. यासाठी 50 चमू थकबाकीदारांचे दररोज सुमारे 1000 नळ कनेक्शन खंडीत करणार आहे.

अशी जाणून घ्या आपली थकीत रक्कम
आपल्या पाणी कराची थकीत रक्कम जाणून घेण्यासाठी नागरिकांना www.ocwindia.com किंवाwww.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर भेट देता येईल. तसेच SMS द्वारे जाणून घेण्यासाठीNMCWTR<आपल्या पाणीबिलावरील कॉन्ट्रॅक्ट अकाउंट नं.> किंवा NMCPRT<आपल्या कर पावतीवरील इंडेक्स नं.> 56161 या क्रमांकावर पाठविता येईल. अधिक माहितीकरिता 1800-266-9899 य़ा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

जनजागृती कार्यक्रम
थकबाकीदारांना माहिती कॉल्सद्वारे देण्यात येत आहे. तसेच झोन निहाय थकबाकीदारांचा डेटा सोमवारपासून नगरसेवकांकडे उपलब्ध होणार आहे. शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्स आणि 6*6 चे बॅनर्स लावण्यात येत आहेत. रेडियो केबल चॅनेल्सवरही जाहीराती देण्यात येत आहे. सोबतच बसेसवर माहितीचे बॅनर्स लावण्यात आले आहे. नागरिकांना या योजनेची माहिती व्हावी यासाठी सुमारे 3 लाख पत्रके वितरीत करण्यात आले आहे.