Published On : Tue, Feb 16th, 2021

प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला तात्काळ द्या – सुनील केदार

विविध विषयांचा आढावा

नागपूर: तोतलाडोह व बावनथडी प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला तात्काळ देण्यात यावा, याबाबत 27 मार्चपर्यंत सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी संबंधितांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जि.प. अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, पाटबंधारे व जलसंपदा विभागाचे अभियंता, पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

भूधारक शेतकऱ्यांच्या नाव, सातबाराच्या नोंदी, जमिनीचे दर, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मोबदला जमा झाल्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे श्री. केदार म्हणाले. शासनाच्या रकमेची सर्व जबाबदारी महसूल विभागाची आहे. 27 मार्चपर्यंत सर्व माहिती सादर करुन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला मिळाला पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले. कुसदावासियांना घरांची रक्कम तात्काळ मिळवून देत नागरी गावात पायाभूत सुविधेपासून उपलब्ध करुन देण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी सांगितले असता त्यावर कुसदा क्र. 1 व 2 या गावाचा एक कोटीचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश श्री. केदार यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले. आदिवासीबहुल गाव असल्याने त्यांना नागरी सुविधा द्या. तोतलाडोह आव्हानात्मक विषय आहे तो सोडविण्यासाठी संयुक्तिक काम करावे लागणार आहे. तसेच या प्रकल्पांतर्गत इतर गावांनासुद्धा नागरी सुविधा उपलबध करुन देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

रामटेक नगरपरिषद हद्दवाढीचा मु्द्दा महत्त्वाचा असून महसूल विभागाने याची दखल घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेवून त्यावर कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम कामगारांच्या नोंदी ऑनलाईन घेण्यात याव्या, कोणतीही नोंद ऑफलाईन आढळल्यास त्याविरुद्ध चौकशी समिती बसवून कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कामगारांना विविध लाभकारी योजनांचा लाभ देण्यात यावा, असे ते म्हणाले.

पालकमंत्री पाणंद रस्त्याबाबत आढावा घेताना रामटेक विधानसभा मतदारसंघात 21 रस्ते मंजूर असून अकरा कामे पूर्ण झाली आहेत तर सहा कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले. 31 मार्चपर्यंत सर्व कामे पूर्ण करुन सर्व निधी खर्च करण्याचे आदेश श्री. केदार यांनी दिले.

पाणंद रस्त्यांची कामे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कायान्वित होतात, परंतु तांत्रिक सहाय्याअभावी प्रलंबित रहातात. यापुढे ही कामे जिल्हा परिषदकडे वर्ग करण्यासाठी महसूल मंत्र्यांना पत्र देणार असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.

भूदान ही विनोबा भावे यांची चळवळ असून ती एक विचारधारा आहे. भूदान जमीन इतरांना विक्री करता येत नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षात किती जमिनीचे पट्टे विक्री करण्यात आल्याची माहिती भूदान मंडळाने सादर करण्याचे निर्देश श्री. केदार यांनी दिले. जमिनीबाबतची संपूर्ण माहिती घेऊन त्याचा अहवाल सादर करत ती नगर परिषदकडे वर्ग करण्याचे त्यांनी सांगितले. सर्व सेवा संघाद्वारे भूदान मंडळास शिफारस करुन मंडळाची स्थापना होते. त्यांमुळे भूदान केलेल्या व्यक्तींची यादी व भूदान मंडळाच्या अकरा सदस्यांची यादी तात्काळ सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले.

बावनथडी व तोतलाडोह प्रकल्पाचे पुनर्वसन, रामटेक नगर परिषद हद्दवाढ, इमारत बांधकाम कामगारांच्या प्रलंबित नोंदणी व लाभकारी विविध योजना, सावनेर व कळमेश्वर मंजूर पालकमंत्री पाणंद रस्त्याचे काम, नागपूर शहर व लागून असलेल्या नगर परिषदांमधील मोकाट व भटक्या कुत्र्यांपासून उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाययोजना आदींचा आढावा घेण्यात आला.