नागपूर टुडे : पवनी वनपरिक्षेत्रातील मौजा सावंगी येथे वन विभागाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत घोरपडीची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. शिकार केलेल्या घोरपडीचे मांस कापून भाजत असताना वन विभागाच्या पथकाने चौघांना रंगेहात पकडले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सावंगी येथील सागर धुर्वे (२३), रवींद्र मरसकोल्हे (४२), प्रशांत मरसकोल्हे (२६) आणि दिनेश आहाके (१८) यांचा समावेश आहे.
सावंगी परिसरात काही जण घोरपडीची शिकार करून तिचे मांस घटनास्थळीच कापून भाजत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पथकाने तत्काळ छापा टाकला. यावेळी आरोपी मांस कापून भाजत असताना आढळून आले.
घटनास्थळावरून जप्ती-
वन विभागाने घटनास्थळावरून घोरपडीचे मांस, दोन सत्तूर, दोन ब्लेड आणि दोन भ्रमणध्वनी जप्त केले आहेत.
आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार बेकायदेशीर प्रवेश, वन्यजीवाची शिकार आणि वनक्षेत्रात आग लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी यापूर्वीही वन्यजीवांच्या शिकारीत सहभागी होते का, याचा तपास वन विभागाकडून सुरू आहे.
उपवनसंरक्षक डॉ. विनीता व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बनसोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.





