नागपूर : पारशिवनी तहसील कार्यालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत २५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भूमापकाला रंगेहाथ पकडले. विशाल माडगीकर असे अटक करण्यात आलेल्या भूमापकाचे नाव आहे.
पारशिवनी येथील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. हिंगणा बाराबाई येथील एका तरुण शेतकऱ्याच्या जमिनीचे शासकीय अभिलेखात विभाजन करण्याचे काम प्रलंबित होते. संबंधित जमीन डब्ल्यूसीएलमध्ये गेल्याने शेतकऱ्याला नोकरी मिळण्याच्या प्रक्रियेशी हे काम संबंधित असल्याचे सांगण्यात येते.
जमिनीचे विभाजन करून देण्यासाठी भूमापक विशाल माडगीकर याने शेतकऱ्याकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली. लाचेची मागणी झाल्यानंतर शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी कार्यालय परिसरात सापळा रचला. शेतकऱ्याकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने विशाल माडगीकर याला रंगेहाथ ताब्यात घेतले.
या प्रकरणी पारशिवनी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, या कारवाईमुळे भूमि अभिलेख विभागात खळबळ उडाली आहे.





