पाटणसावंगीतील जाहीरसभा शेवटच्या दिवशी गाजली सुमारे 10 हजारावर नागरिकांची उपस्थिती
नागपूर: पाटणसावंगीत जाहीरसभेला मी येऊ नये असे प्रयत्न झाले. पण आपल्याला फक्त प्रेमाने थांबविता येऊ शकते, धमक्यांनी नव्हे. धमक्यांचे दिवस आता गेले. ठोकशाही करू नका अन्यथा घरात घुसून मारण्याची आमचीही ताकद असल्याचा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाटणसावंगी येथील जाहीरसभेत दिला.
भाजपा-शिवसेना महायुतीचे सावनेर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांच्या प्रचारार्थ आज ही जाहीरसभा झाली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या जाहीरसभेने वातावरणच बदलून गेले होते. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. राजीव पोतदार, प्रकाश टेकाडे, संजय टेकाडे, रमेश मानकर, अरविंद गजभिये, अविनाश खळतकर, श्रीमती मीना तायवाडे, श्रीमती मोवाडे, अशोक धोटे, सोनबा मुसळे, शिवसेनेचे राजू हरणे, किशोर मुसळे, सुरेंद्र शेंडे, ज्ञानेश्वर गुडधे, इमेश्वर यावलकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- आम्ही लोकशाही मानतो, कायद्यावर आमचा विश्वास आहे. आमच्या नादी लागायचे नाही. निवडणुका लोकशाही मार्गाने लढविल्या पाहिजे. कायदा हातात घेतला तर खपवून घेतले जाणार नाही. छत्रपतींच्या विचारावर श्रध्दा ठेवणारे हे राज्य आहे. ठोकशाहीचा प्रयत्न केला तर जनता मतपेटीतून ढकलून देईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या राज्यात आणि देशात आमचे सरकार आहे. पारदर्शी आणि प्रामाणिकतेने आम्ही पाच वर्षे कारभार चालविला. भ्रष्टाचाराचा एक डागही माझ्यावर नाही. परिवर्तन होते आहे. अमेठीत मतदारांनी परिवर्तन करून काँग्रेसचा पराभव केला. जनता सावनेरचे अमेठी केेल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले- भाजपा सेनेच्या या सरकारने 50 लाख शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा करून कर्जमाफी केली. दुष्काळ, अवर्षण, शेततळे, बोंडअळी, ट्रॅक्टर असे विविध अनुदान शेतकर्यांना दिले. 18000 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना पोचवल्या. घरकुल योजना आणली. 2021 पर्यंत जिल्ह्यातील गरीब माणसाचे पक्के घर झालेले असेल. पुढच्या काळात 10 हजार लोकांना जमिनीचे मालक बनवू असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मतदारसंघातील डॉ. राजीव पोतदार यांच्या नावासमोरील कमळाची बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. राजीव पोतदार, सोनबा मुसळे, ज्ञानेश्वर गुडधे, सुरेंद्र शेंडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. या लहानशा गावात बाजार चौकात 10 हजार नागरिकांनी उपस्थिती लावली होती.