प्रचंड उत्साहात 10 हजारावर नागरिक झाले सहभागी
नागपूर: दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना-रिपाई-बरिएमं महायुतीचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार रॅलीने गोपालनगर व परिसर आणि दुमदुमून गेेला. प्रचंड उत्साहात दहा हजारावर नागरिक, महिला व युवक या रॅलीत आज सकाळी सहभागी झाले होते.
आज सकाळी 10 वाजता माटे चौकातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार व अभिवादन केले. त्यानंतर ही प्रचार रॅली सुरु झाली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी निघालेल्या या रॅलीत सहभागी झालेल्या युवकांनी आणि महिलांनी हातात पक्षाचे झेंडे व चेहर्यावर देवेंद्र फडणवीस यांचे मुखवटे लावले होते. तर तरुणांनी ‘मी देवेंद्र’ असे अंकित केलेले बनियन्स घातले होते.
एका मोठ्या रथावर देवेंद्र फडणवीस उभे राहिले. त्यांच्या शेजारी त्यांच्या पत्नी अमृत फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. विकास महात्मे, माजी मंत्री अॅड. सुलेखाताई कुंभारे, भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके प्रामुख्याने उभे होते. देवेंद्र फडणवीस यांचे निवडणूक प्रमुख संदीप जोशी यांनी संपूर्ण रॅलीचे यशस्वी संचालन केले. अग्रभागी प्रा. राजीव हडप, नगरसेवक प्रमोद तभाने, दिलीप दिवे, आणि या भागातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.
माटे चौकातून निघालेल्या ही रॅली गोपालनगरमधील प्रमुख मार्गाने जाऊन गेलेल्या या रॅलीच्या समोर या भागातील महिलांनी सडा व रांगोळ्या काढल्या होत्या. मार्गाने देवेंद्र फडणवीस यांच्या रथावर उंच इमारतींवर महिला व या भागातील मतदार पुष्पवृष्टी करीत होते. प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसत होता. स्वावलंबीनगर शिवाजी पुतळ्याजवळ ही रॅलीचा समारोप झाला. तेथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.

