नागपूर : शहरातील यादव नगर गवलीपुरा परिसरात नव्याने उभारण्यात आलेला ब्रीज अद्याप वाहतुकीसाठी सुरू होण्याआधीच धसकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुसळधार पावसामुळे या ब्रीजवर गड्डे पडले असून, निकृष्ट दर्जाच्या कामाचा नागरिकांनी तीव्र निषेध केला आहे.
एका नागरिकाने या ब्रीजचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यामध्ये पुलाचा एक भाग पूर्णपणे खाली बसलेला स्पष्टपणे दिसून येतो. हा ब्रीज अजून अधिकृतपणे सुरूही झाला नव्हता, मात्र त्याआधीच त्याच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकारामुळे बांधकामाच्या दर्जावर, नियोजनावर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर गंभीर शंका उपस्थित झाल्या आहेत. करदात्यांच्या पैशातून उभारण्यात येणाऱ्या अशा प्रकल्पांमध्ये इतकी निष्काळजीपणा का, असा सवाल नागरिक करत आहेत.
नागरिकांनी प्रशासनाकडून तत्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा प्रकार केवळ आर्थिक अपव्यय नाही, तर लोकांच्या जीवाशी खेळ करणारी दुर्लक्ष आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.