Advertisement
नागपूर : बेलतरोडी ते पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, घोगळी या मार्गावर उभारण्यात आलेला पूल मुसळधार पावसामुळे आलेल्या ओव्हरफ्लो पाण्यामुळे वाहून गेला आहे. विशेष म्हणजे, या पुलाचे बांधकाम अवघ्या एका महिन्यापूर्वीच पूर्ण करण्यात आले होते.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाच्या जोरामुळे ओढ्याला पूर आला आणि मोठ्या प्रमाणात पाणी पुलावरून वाहू लागले. काही तासांतच पूल कोसळला आणि दोन्ही बाजूंचा संपर्क पूर्णतः तुटला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त होत आहे.
केवळ महिन्याभरात पूल कोसळल्याने या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाकडून चौकशीची मागणी होत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाने या मार्गावर प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून, पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सांगितले आहे.