
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे पुढील सहा महिन्यांत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा मोठा दावा भाजप नेते परिणय फुके यांनी केला आहे. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत फुके यांनी हा दावा करत रोहित पवार तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले.
रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात नेतृत्वावरून अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचा दावा फुके यांनी केला. स्वतःच्या पक्षातील स्थान टिकवण्यासाठी आणि राहुल गांधी यांना खूश करण्यासाठीच रोहित पवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली-
परिणय फुके म्हणाले की, MPSC विद्यार्थ्यांनी केलेल्या १३ मागण्यांपैकी १२ मागण्या मुख्यमंत्री स्तरावर यापूर्वीच मान्य करण्यात आल्या आहेत. MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेणे हा राज्य सरकारच्या अधिकारातील विषय नसून त्याबाबतचा निर्णय राष्ट्रपतींच्या कार्यकक्षेत येतो, असा दावाही त्यांनी केला.
रोहित पवार विद्यार्थ्यांची दिशाभूल करून त्यांना आंदोलनासाठी भडकवत असल्याचा आरोप फुके यांनी केला. तसेच राहुल गांधी यांनी आंदोलनाला भेट दिल्याशिवाय आंदोलन सुरू ठेवले जाईल आणि राहुल गांधी आंदोलनस्थळी आल्यानंतर हे आंदोलन गुंडाळले जाईल, असा दावा त्यांनी केला.
यानंतर पुढील सहा महिन्यांत रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असेही फुके यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
राहुल गांधींवरही फुके यांची टीका-
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर आणि मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या आरोपांवरही परिणय फुके यांनी टीका केली.
राहुल गांधी यांचे आंदोलन देशाची बदनामी करण्याच्या उद्देशाने असल्याचा आरोप त्यांनी केला. भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असताना देशात विदेशी गुंतवणूक येऊ नये, यासाठी राहुल गांधी काम करत असल्याचा गंभीर आरोप फुके यांनी केला.तसेच राहुल गांधी यांच्यामागे ‘अर्बन नक्षलवादी’ शक्ती असल्याचा आरोप करत फुके यांनी राहुल गांधी यांना ‘अर्बन नक्षल’ असेही संबोधले.
फुके यांच्या या दाव्यांवर रोहित पवार आणि काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



