Published On : Mon, Jul 12th, 2021

पालकांनी मुलांना न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन लस द्यावी -जिल्हाधिकारी आर. विमला

Advertisement

नागपूर: निमोनियापासून लहान बाळांच्या संरक्षणासाठी त्यांना न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन ((पीसीव्ही) देण्यासाठी पालकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. देवेन्द्र पातुरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षा मेश्राम व डॉ. इनामदार उपस्थित होते. पालकांना या लसीबाबत काही अडचण असल्यास जवळच्या आरोगय केंद्रात किंवा अंगणवाडी सेविका व आशा वर्करशी संपर्क साधण्याचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले.

बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे, यासाठी राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. त्यामध्ये आता न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) या नवीन लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे.

एक वर्षाच्या आतील बालकांना निमोनिया, मेनेटांयटीस, बॅक्टेरीमिया, सेपसीस, ओटायटीस आणि सायनुसायटीस आजारापासून ही लस संरक्षण देईल. न्युमोकोकल/निमोनिया हा फुफ्फुसांना होणारा संसर्ग आहे. ज्यामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो. धाप लागते आणी ताप व खोकला येतो. संसर्ग गंभीर स्वरूपाचा असल्यास मृत्यु सुध्दा होऊ शकतो असे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी सांगितले.

यावर उपाय म्हणून देण्यात येणारी (पीसीव्ही) ही लस मुलांना तीन डोसमध्ये देण्यात येते. पहिला डोस 6 आठवडे, दुसरा डोस 14 आठवडे, व तिसरा बुस्टर डोस 9 महीने या वयात देण्यात येते, असे जिल्हा शल्य चिकीत्यक डॉ.देवेन्द्र पातुरकर यांनी सांगितले.

जिल्हास्तरावर पीसीव्ही लस उपलब्ध झाले असून ते सर्व सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय,उपजिल्हा रुग्णालय, येथे उपलब्ध्‍ आहे. उद्या दि.13 जुलै रोजी नियमित लसीकरण सत्रामध्ये मुलांना मोफत देण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील नियमित लसीकरण सत्र दर मंगळवार व गुरूवार या दोन दिवशी होते. या दिवशी कार्यक्षेत्रातील बालकांचे लसीकरण करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फुटाणे यांनी दिले. या लसीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आवश्यक ते प्रशिक्षण झाले असल्याची माहिती डॉ. हर्षा मेश्राम यांनी सांगितले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय शिलकर, जिल्हा हिवताप अधिकारी उपस्थित होते.