Published On : Mon, Jul 12th, 2021

दहावी, बारावी नंतरच्या करिअरसंबंधी शंकांसाठी मनपातर्फे नि:शुल्क समुपदेशन केंद्र

महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते केंद्राचे शुभारंभ : उमेश कोठारी करणार आठवड्यातील तीन दिवस समुदेशन

नागपूर : दहावी आणि बारावी हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्वाचे टर्निंग पॉईंट आहेत. यावेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरवर त्याचा प्रभाव पडतो. दहावी, बारावी नंतर पुढे काय, व्यावसायिक शिक्षणासाठी कुठले कोर्स, प्रवेशाची प्रक्रिया काय, ती कशी पूर्ण करायची अशा एक ना अनेक प्रश्नांनी सर्वसामान्य विद्यार्थी आणि पालक ग्रस्त असतात. परिणामी योग्य माहिती व मार्गदर्शन न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. विद्यार्थी आणि पालकांच्या अशा समस्यांसंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांनी पुढाकार घेत मनपा शिक्षण समिती आणि श्री. उमेश कोठारी यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा मुख्यालयात नि:शुल्क समुपदेशन केंद्र सुरू केले आहे.

Gold Rate
16 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,700 /-
Gold 22 KT ₹ 1,03,000 /-
Silver/Kg ₹ 1,29,800/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा मुख्यालयातील महापौर कार्यालयामध्ये हे समुपदेश केंद्र असून सोमवारी (ता.१२) महापौर दयाशंकर तिवारी यांनी त्याचे शुभारंभ केले. याप्रसंगी शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे व समुपदेशक उमेश कोठारी उपस्थित होते.

दहावी आणि बारावी नंतर पुढे काय करायचे, हे महत्वाचे प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांसमोर असतात. शिक्षित असलेल्या किंवा नसलेल्या पालकांना सुद्धा प्रवेशासाठी काय तयारी करावी लागते तसेच त्यासाठी कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता असते याबद्दलही माहिती नसते. त्यामुळे निकालानंतर पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अकरावीच्या किंवा बारावीनंतरच्या प्रवेशासाठीसुद्धा वेगवेगळ्या फे-या असतात. यामध्ये कुठल्या फेरीत आपल्या पाल्याला प्रवेश मिळू शकेल याची माहिती सुद्धा पालकांना नसते. या सर्व प्रश्नांचे उत्तरे देत विद्यार्थी व पालक यांना दिलासा मिळावा या उद्देशाने हे समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. समुपदेशन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना नि:शुल्क समुपदेशन करणारे उमेश कोठारी यांचा यावेळी महापौरांनी पुष्पगुच्छ देउन सन्मान केला.

श्री. उमेश कोठारी मनपा मुख्यालयातील महापौर कार्यालय येथे स्थित समुपदेशन केंद्रामध्ये दर आठवड्याला सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस सकाळी ११ ते दुपारी २ वाजतापर्यंत समुपदेशन करणार आहेत. श्री. उमेश कोठारी हे मागील १५ वर्षांपासून करिअर समुपदेशनाचे कार्य करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी १५ हजार विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले असून ४५०० विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झालेला आहे. मनपाच्या समुपदेशन केंद्रामध्ये श्री.कोठारी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचा कुठल्या क्षेत्राकडे कल आहे आणि त्यासाठी तयारी कशी करायची, अशा अनेक बाबींबाबत मार्गदर्शन करतील.

मनपा केंद्रातून विद्यार्थ्यांना नि:शुल्क समुपदेशन करणारे उमेश कोठारी म्हणाले, व्यावसायिक प्रशिक्षणासाठी ऑनलाईन परीक्षेच्या निकालाच्या आधारावर मेरीट यादीनुसार प्रवेश निश्चित करण्यात येते. अशा सर्व स्पर्धात्मक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्याला मिळालेल्या गुणांनुसार कुठला पसंतीक्रम द्यायचा आणि प्रवेश प्राप्त करीत असताना वेगवेगळ्या फे-यामधून कसे जायचे याबाबत सविस्तर माहिती समुपदेशनादरम्यान देण्यात येईल. विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने संपूर्ण देशातील सर्व व्यावसायिक स्पर्धात्मक परीक्षांबद्दल ज्या काही शंकाकुशंका आणि प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत त्याचे निराकरण करुन समाधान करण्याचा प्रयत्न विद्यार्थी समुपदेशन केंद्रामध्ये केले जाईल, असेही श्री.कोठारी यांनी सांगितले.

विद्यार्थी आणि पालकांच्या हिताच्या दृष्टीने मनपातर्फे ही नि:शुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून याचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement